क्रेडिट कार्डद्वारे गंडा

क्रेडिट कार्डद्वारे गंडा

कोल्हापूर - पोस्टाने घरी आलेले क्रेडिट कार्ड पाकिटातून बाहेरही काढले नाही. तरीही तीन वेळा त्यावरून पैसे खर्च झाले आहेत. 
क्रेडिट कार्डवरून झालेल्या फसवणुकीची तक्रार देण्यासाठी गेलेल्या तरुणाला पोलिस ठाण्यात दादच दिली नाही. अखेर त्यांनी पोर्टलवरून ऑनलाईन तक्रार अर्ज दाखल केला. पुढे याची प्रत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर पोलिस जागे झाले. त्यांनी तक्रारदारांना बोलावून घेतले आणि ऑनलाईन झालेली फसवणूक रेकॉर्डवर आली. या तक्रारीमुळे क्रेडिट कार्डचा भूलभुलय्या आज पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

मनोज पाटील (संभाजीनगर) हे खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांनी एका पेट्रोलियम कंपनीचे क्रेडिट कार्ड घेतले. नामांकित बॅंकेच्या माध्यमातून हे कार्ड मिळाले. कार्ड पाकिटातून काढण्यापूर्वीच त्यांच्या मोबाइल हॅंडसेटवर तीनवेळा पैसे काढल्याचे मेसेज आले. प्रत्यक्षात कार्डचा वापर केला नसल्याचे पाटील यांनी सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट संबंधित पेट्रोलियम कंपनीशी संपर्क साधला. तेव्हा नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार करा, असे सांगितले.

पाटील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गेले. तेथे पोलिसांनी टाळाटाळ केली. अखेर त्यांनी सायबर सेलकडे धाव घेतली. तेथे त्यांच्या फसवणुकीबद्दल खात्री करण्याचा प्रयत्न झाला. मात्र तक्रार घेतली नाही. पोलिस ठाण्यातच तक्रार देण्याचा सल्ला दिला. अखेर दोन्ही ठिकाणी दाद मिळत नसल्यामुळे पाटील यांनी थेट ऑनलाईन पोर्टलवरून तक्रार दिली. 

यानंतर पोलिस ठाणे खडबडून जागे झाले. ऑनलाईन तक्रारीची प्रिंट जुना राजवाडा पोलिसांच्या हाती पडली. त्यांनी पाटील यांना बोलावून घेतले. पुढे संबंधित कंपनीकडे अधिकृत कागदपत्रांची मागणी करून ते शांत झाले. १३ जुलैला ही तक्रार दिली, मात्र अद्यापही पोलिसांकडून पुढे काहीच तपास झाला नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

कार्ड घेतले ः  १६ मार्च २०१८
कार्ड न वापरता खर्ची पडले ः २४ मे २०१८ ः दुपारी २.२५  मिनिटांनी (९ हजार ८७३ रुपये) 
कार्ड न वापरता खर्ची पडले ः २४ मे २०१८ ः दुपारी २.३१ मिनिटांनी (१९ हजार रुपये)
कार्ड न वापरता खर्ची पडले ः २५ मे २०१८ ः दुपारी ३.०६ मिनिटांनी (१९ हजार रुपये)
कार्ड कंपनीच्या पोर्टला तक्रार दिली ः २९ मे २०१८
कार्ड कंपनीकडून तक्रारीबाबत उत्तर ः १६ जून २०१८

*कंपनीकडून उत्तर ः पैसे ओटीपी शेअर केल्यामुळे खर्च पडले आहेत. ः १९ जून २०१८
*पाटील यांचा खुलासा ः क्रेडिट कार्ड अद्याप पाकिटातून काढलेच नाही तर स्वीप कसे झाले? ओटीपी मिळालाच नाही तर पैसे कसे खर्ची पडले?

पैशासाठी तगादा 
संबंधित क्रेडिट कार्ड असलेल्या पेट्रोलियम कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पैशासाठी तगादा लावला आहे. जेव्हा जेव्हा संबंधित कर्मचारी पैशाची मागणी करतात तेव्हा पाटील यांनी फसवणूक झाल्याचे त्यांना सांगितले आहे. याचबरोबर ज्या व्यक्तीकडून हे क्रेडिट कार्ड घेतले आहे, त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यानेही ठोस उत्तरे दिली नाहीत. त्याचेही रेकॉर्डिंगसुद्धा असल्याचे पाटील यांनी सांगितले.

अनेक ग्राहकांची फसवणूक
क्रेडिट कार्ड घेतल्यापासून पाकिटातून काढलेच नाही. ओटीपी मिळालाच नाही, तरीही तीनवेळा पैसे खर्च झाल्याचे एसएमएस आले. पोलिसांनी जलद प्रयत्न केल्यास माझ्यासारख्या अनेक ग्राहकांची फसवणूक रोखता येईल, असे तक्रारदार मनोज पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com