इस्लामपुरात कामगार सेनेच्या नेत्यावर गुन्हा 

 Crime against leader of labor group in Islampur
Crime against leader of labor group in Islampur

इस्लामपूर : सेंट्रिंग कामगाराला जीवे मारण्याची धमकी देत शासनाकडून मिळवून दिलेल्या मदतीच्या रकमेतील 10 हजार रुपये उकळल्याप्रकरणी स्वराज्य जनरल कामगार सेनेचा नेता अमित बजरंग कदम (रा. इस्लामपूर) याच्यावर आज इस्लामपूर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मागच्या आठवड्यात सोशल मीडियावर अफवा पसरवल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. त्यानंतर लगेच आज हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी संभाजी दादू शिरसठ (रा. शिवाजी चौक, इस्लामपूर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरसठ हे गेली 30 वर्षे सेंट्रिंग काम करतात. अमित कदम हा पूर्वी त्यांच्या शेजारी भाड्याने राहात होता. 2017 ला कदमने शिरसठ यांना तुम्ही आमच्या स्वराज्य संघटनेचे सभासद व्हा, शासनाकडून कामगारांच्या मुलांसाठी मिळणारे लाभ देतो, असे सांगितले. त्यानंतर त्यांना महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे पुस्तक मिळाले. शिरसठ यांची मुलगी बी.एस्सी.मध्ये शिकत होती. त्यावेळीही कदमने मुलींच्या शिक्षणासाठी 25 हजार रुपये मिळतात, असे सांगून बांधकाम कामगार लाभार्थी नोंदणी करायला लावले.

27 एप्रिल 2018 ला शासनाकडून शिरसठ यांच्या खात्यात 25 हजार रुपये जमा झाले. त्यानंतर लगेच 27 एप्रिलला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कदम आणखी एकासोबत शिरसठ यांच्या घरी गेला. "मुलीच्या खात्यात 25 हजार जमा झाले आहेत. मी तुमचे काम करून दिले आहे. मला काही रक्कम वरच्या अधिकाऱ्यांना द्यावी लागते. तुम्हाला मिळालेल्या रकमेतून मला 10 हजार द्या, नाहीतर यापुढे मी तुम्हाला कोणतीही मदत मिळवून देणार नाही. तसेच मिळालेली रक्कमसुद्धा रद्द करायला लावेन,' अशी धमकी दिली.

त्याला घाबरून शिरसठ त्यांच्या गाडीवर बसले आणि इस्लामपूर नगरपालिकेजवळ असलेल्या बॅंकेच्या सेतू कार्यालयात जाऊन 10 हजार रुपये काढून दिले. त्याचवेळी कदमने पैसे दे नाही तर मी तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली आणि त्याच्यासोबत असलेल्याने बघून घेतो, असा दम दिला. त्याची स्वतःची कामगार संघटना आहे आणि त्याची राजकीय लोकांमध्ये ऊठबस असते, म्हणून शिरसठ यांनी भिऊन यापूर्वी तक्रार दिली नव्हती. इस्लामपूर पोलिसांत सदर घटनेची नोंद झाली असून, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्याकडे तपास आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com