अपघातग्रस्त ट्रॅक्‍टर पेटविल्याबद्दल ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्यावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

जयसिंगपूर - अपघातात तरुण ठार झाल्यानंतर अपघातग्रस्त ट्रॅक्‍टर पेटविल्याबद्दल सांगलीतील ‘एमआयएम’चा कार्यकर्ता इम्रान महंमद जमादार याच्याविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

जयसिंगपूर - अपघातात तरुण ठार झाल्यानंतर अपघातग्रस्त ट्रॅक्‍टर पेटविल्याबद्दल सांगलीतील ‘एमआयएम’चा कार्यकर्ता इम्रान महंमद जमादार याच्याविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

कोल्हापूर-सांगली महामार्गावरील उदगावच्या (ता. शिरोळ) हद्दीत आज ट्रॅक्‍टर आणि मोटारसायकल यांच्यातील अपघातात मोहसीन शब्बीर मुल्ला (वय ३४, रा. शंभर फुटी रोड, गणेशनगर, सांगली) हा तरुण जागीच ठार झाला. यानंतर अपघातग्रस्त ट्रॅक्‍टर पोलिस ठाण्यासमोरच पेटविण्यात आला. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्‍यात आणल्याने दुर्घटना टळली.

उदगावमधील खोत पेट्रोलपंपासमोर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्‍टर उदगावहून जयसिंगपूरकडे येत होता; तर मोहसीन मुल्ला उदगावकडे जात असताना हा अपघात घडला. डोक्‍यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसपाटील अनुराधा कांबळे यांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. घटनास्थळी पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने पोलिस ठाण्यासमोर उभी करण्यात आली.

अपघातानंतर ट्रॅक्‍टरचालक फरारी झाला. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली. जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. 

काही वेळाने इम्रान हा हातात बाटलीतून पेट्रोल घेऊन पोलिस ठाण्यासमोरील ट्रॅक्‍टरजवळ आला. त्याने बाटलीतील पेट्रोल ट्रॅक्‍टरच्या पुढील भागावर ओतून पेटविला. जवळच असणाऱ्या चहाच्या गाड्यावरील तरुणाने ठाण्यात धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी तातडीने धाव घेऊन तरुणाला ताब्यात घेत अग्निशमन दलाला पाचारण करून तोपर्यंत आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. 

दुर्घटना टळली
अपघातानंतर इम्रान जमादार याने ट्रॅक्‍टरवर पेट्रोल ओतून पेटवून दिला. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी तातडीने धाव घेत इम्रानला ताब्यात घेतले. शिवाय, आग आटोक्‍यात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यामुळे ट्रॅक्‍टर भस्मसात होण्यापासून वाचला.

Web Title: Crime against the MIM activist in Jayasingpur