अतुल मानेंवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

सांगली - मदन पाटील गटाचे म्हणवले  जाणाऱ्या अतुल माने यांनी भाजप प्रवेशाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी म्हणून येथील तरुण भारत स्टेडियमवर दहीहंडीचा कार्यक्रम घेतला. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या स्वागतासाठी मंगळवारी रात्री उशिरा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगलीत दाखल झाले.

सांगली - मदन पाटील गटाचे म्हणवले  जाणाऱ्या अतुल माने यांनी भाजप प्रवेशाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी म्हणून येथील तरुण भारत स्टेडियमवर दहीहंडीचा कार्यक्रम घेतला. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या स्वागतासाठी मंगळवारी रात्री उशिरा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगलीत दाखल झाले.

त्यावेळी स्वागतासाठी केलेला दणदणाट अंगलट आला आहे. 
ध्वनियंत्रणेची मर्यादा ओलांडल्याने शहर  पोलिसांनी मंत्र्यांनी सांगली सोडताच सारे साहित्य ताब्यात घेत मानेसह पाच जणांवर आज गुन्हा दाखल केला.

काँग्रेसमधील मदन पाटील युवा मंचचे कार्यकर्ते म्हणून माने यांची ओळख. महापालिकेतील विविध कामांच्या ठेकेदारीचाही त्यांच्या गाठी अनुभव आहे. नुकतीच त्यांनी स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील यांच्या विरोधात ताकदीने लढत दिली. मात्र, पराभव झाला. त्यानंतर त्यांना भाजप प्रवेशाचे वेध लागले होते. कालचा मुहूर्त साधताना त्यांनी शहरात मोठ मोठे फलक लावून वातावरण निर्मिती केली होती.

लाखांच्या दहीहंडीचा कार्यक्रमाचा बेत रचला. मोठा झगमगाट केला. भाजप नेत्यांची मांदियाळी बोलवली. रात्री उशिरा संगीताचा (?) दणदणाट करीत सारा काही बेत जमवला. नेते आले. घोषणा झाल्या. मात्र त्यावेळी आवाजाचे भान सुटले. पोलिसांनी मंत्री जाईपर्यंत वाट पाहिली आणि रात्री सारी साधनसामग्री शहर पोलिस ठाण्यात जमा केली. दादांचे शाही स्वागत मानेंच्या असे अंगलट आले.

रात्री ध्वनी मर्यादेबाबत पोलिसांनी वारंवार समज देवूनही आवाज कमी करण्यात आला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर गुन्हा दाखल करण्याशिवाय  पर्यायच उरला नाही. आज दिवसभर गुन्हा दाखल करण्यावरून खलबते सुरू होती. अखेर सायंकाळी पोलिसांनी ते जाहीर केले. मानेंसह ओंकार दिलीप माने (परवाना अर्ज धारक), ध्वनियंत्रणेचे मालक अक्षय  कृष्णा पाटील (वय २९, खणभाग), मनोज भरत पाटील (वखारभाग), रितेश ऊर्फ बंदी अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पाचही जणांवर महाराष्ट्र पोलिस कायदा व पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.

कारवाईला पाठिंबाच ! 
दहीहंडीचा कार्यक्रमाची परवानगी घेण्यापूर्वीच ध्वनियंत्रणेचा आवाज मर्यादित ठेवण्याची समज आणि नोटस देण्यात आली होती. तरीही ध्वनियंत्रणेच्या आवाजाची मर्यादा ओलांडली. त्यानंतरही सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु रात्री दहानंतरही ध्वनियंत्रणा सुरू राहिली. मंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये या ध्वनिप्रदूषणाबद्दल सातत्याने आक्रमक असून शिस्त पाळणाऱ्या गणेश मंडळांना त्यांनी बक्षिसी द्यायची योजना राबवली आहे. त्यामुळे दादांकडून या कारवाईला कोणताच अडसर होणार नाही हे पोलिस ओळखून होते.

Web Title: crime on Atul Mane