सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी; जागेच्या वादातून केला खून

भांडण सोडवण्यास गेलेल्या मेहुण्यावरही केले वार, नेजतील घटना
सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी; जागेच्या वादातून केला खून

सदलगा (बेळगाव) : जागेच्या वादातून चाकूने भोसकून सख्ख्या भावाचा खून करण्यात आला आहे. बुधवारी (14) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास नेज (ता. चिक्कोडी) येथून पाच किलोमीटर अंतरावरील शेतीवाडीतील घराच्या परसात ही घटना घडली. भरमू शिवाजी कोळी (वय ३०) मयताचे नाव आहे. आरोपी बंडू शिवाजी कोळी (वय २८) यास सदलगा पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक बातमी अशी, नेज येथील शेतीवाडीतील घराच्या परसात भरमू शिवाजी कोळी याने शौचालय बांधकाम करण्यासाठी खड्डा काढला होता. त्याचा भाऊ बंडू शिवाजी कोळी याचे घर सखल भागात असल्याने पाणी जात होते. याबद्दल बंडू याने आपल्या हद्दीत पाणी का काढले, या कारणावरून भांडण काढले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. भरमू याची पत्नी मीनाक्षी हिने आपल्या माहेरून वडील व भावाला बोलावून घेऊन वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी बंडू शिवाजी कोळी (वय २८) याने दारूच्या नशेत भरमू शिवाजी कोळी यास शिवीगाळ करत, हेतुपूर्वक पोटात आणि पाठीत चाकूने वार केला. त्यात भरमू हा गंभीर जखमी झाला. उपचारासाठी दवाखान्यास नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी बंडू शिवाजी कोळी याला ताब्यात घेतले. मयताची पत्नी मीनाक्षी भरमू कोळी यांनी रात्री उशिरा सदलगा पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दिली. भारतीय दंड विधान कलम 302, 304 व 504 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घटनास्थळी चिक्कोडीचे पोलिस उपाधीक्षक मनोजकुमार नायक यांच्या नेतृत्वाखाली मंडल पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आर. वाय. बिळगी यांच्या उपस्थित प्रोबेशनरी पोलिस उपनिरीक्षक भरत एस, हवालदार प्रमोद कुलकर्णी, ए. एस. गोडसे, एस. ए. जमकोळी, एस. एन. कडबी, एस. एच. देवर यांनी आरोपी बंडू कोळी यास सोबत घेऊन घटनेचा पंचनामा केला. पोलिस पुढील तपास करत आहेत. मयत भरमू याच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

भांडण सोडविण्यास गेलेल्या मेहुण्यावरही वार

भांडण सोडविण्यास गेलेला भरमू कोळी याचा मेहुणा प्रमोदकुमार कोळी (वय २४, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ) याच्या पोटावर वार करण्यात आला. त्यामुळे तोही जखमी झाला आहे. त्याच्यावर चिक्कोडी येथील सरकारी दवाखान्यात उपचार चालू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com