कुंडली १५० मध्ये; ५० ला भविष्य

कुंडली १५० मध्ये; ५० ला भविष्य

कोल्हापूर - अवघ्या ५० रुपयांत भविष्य, तर १५० रुपयांत जन्मकुंडली काढून देण्याच्या नावाखाली संशयित नरके बाबा सावज हेरतो. दैवी शक्ती प्राप्त असून त्याआधारे आलेल्या सावजाच्या समस्या दूर करण्याचा विश्‍वास देतो. त्यातूनच त्याने गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्याच्या जप्त केलेल्या संगणक व हार्ड डिस्कमधून खरे सत्य उघड करण्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

कौटुंबिक त्रासापासून मुक्ततेसाठी तसेच स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी धार्मिक विधीचा बहाणा करत भोंदूबाबाने युवतीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार काल (सोमवारी) उघडकीस आला. पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित भोंदूबाबा मनोज नरके ऊर्फ नरके बाबा याला अटक केली. सागरमाळ येथील छत्रपती कॉलनीत त्याचे दुमजली घर आहे. घराच्या दर्शनीच त्याने ज्योतिष कार्यालयाचा फलक लावला आहे. दर्शनी खोलीत कार्यालय आहे. पहिल्या मजल्यावर त्याचे कुटुंब राहते. एकमेकांच्या सांगण्यावरून वाणिज्य शाखेचा पदवीधर असलेला हा भोंदू प्रसिद्धीस आला.

भविष्य सांगण्यासाठी ५० रुपये, तर कुंडली काढण्यासाठी १५० रुपये घेतो. त्यामुळे त्याच्याकडे स्थानिकांसह उपनगर व जिल्ह्यातील आसपासच्या ठिकाणाहून लोक येत होते. दर्शनी खोलीत तो लोकांशी संवाद साधत असे. भविष्य सांगत तो आतून दरवाजा बंद करून घेत होता. त्या खोलीत देवदेवतांचे अस्तित्व असल्याचे सांगत पावित्र्य राखण्याच्या सूचना सर्वांनाच दिल्या होत्या. त्या खोलीत सहसा कोणी ये-जा करत नसे. तरुण, वयोवृद्धांचे तो भविष्य सांगत असल्याने त्याच्यावर कोणाचा संशय येत नव्हता. याचाच फायदा घेत त्याने सावज शोधून त्यांना भविष्य सुखमय करण्याचे आमिष दाखवत त्याची शिकार केली असावी, असा संशय प्राथमिक तपासाअंती पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दैवी शक्तीआधारे १६ ते ५० वयोगटांतील महिलांत शक्ती निर्माण करण्याचा दावा त्याने केल्याचे पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांच्या संशयाला बळकटी मिळाली आहे. ज्योतिष कार्यालयातील नरके बाबाचा संगणक व हार्ड डिस्क पोलिसांनी जप्त केली आहे. त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्या संपर्कात आतापर्यंत कोणकोण आले आहे, त्यांची काही तक्रार आहे का, याची चाचपणी पोलिसांकडून केली जात आहे.

मनोज नरकेला न्यायालयीन कोठडी
भविष्य सांगण्याच्या बहाण्याने युवतीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी अटक केलेल्या मनोज नरके ऊर्फ नरके बाबा याची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पीडित मुलीच्या फिर्यादीनंतर रात्री उशिरा त्याच्यावर अटकेची कारवाई केली होती. तपासासाठी त्याच्या घरातील संगणकमधील हार्ड डिस्क ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.

संशयित भोंदू बाबाने कोणा महिलेशी गैरवर्तन केले असेल, तर संबंधितांनी याबाबत राजारामपुरीतील पोलिस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी यांच्याशी संपर्क साधावा. त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाईल. तसेच संबंधित महिलेचे नावही गोपनीय ठेवण्यात येईल.
- औदुंबर पाटील,
पोलिस निरीक्षक, राजारामपुरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com