पैसे वसुलीप्रकरणी धमकावल्याने पाच सावकारांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

सातारा : तमाशा मंडळ उभारणीसाठी व्याजाने घेतलेल्या 21 लाख
रुपयांच्या वसुलीसाठी धमकावल्याप्रकरणी अतीत (ता. सातारा) व उंब्रज (ता.
कऱ्हाड) येथील पाच खासगी सावकारांवर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : तमाशा मंडळ उभारणीसाठी व्याजाने घेतलेल्या 21 लाख
रुपयांच्या वसुलीसाठी धमकावल्याप्रकरणी अतीत (ता. सातारा) व उंब्रज (ता.
कऱ्हाड) येथील पाच खासगी सावकारांवर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मज्जीद मुल्ला, चव्हाण (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), हणमंत कारंडे (तिघे
रा. अतीत), मुन्ना पटेल व सुभाष जावळे (दोघे रा. उंब्रज) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत दत्तात्रय नानासो सोनावणे (रा. अतित, ता. सातारा) यांनी फिर्याद नोंदवली आहे. सोनावाणे यांनी तमाशा मंडळ उभारणीसाठी गावातील मुल्ला याच्याकडून दि. 19 मे 2011 ते 24 एप्रिल 2017 या काळात 16 लाख 65 हजार रुपये दर महा पाच टक्के व्याजाने घेतले होते. तमाशाच्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून सोनावणे यांनी त्याला वेळोवेळी 37 लाख 25 हजार रुपये रक्कम परत दिली.

त्यानंतर त्यांना पुन्हा गावातीलच चव्हाण नावाच्या व्यक्तीकडून 20 जून
2016 या कालावधीत दरमहा पाच टक्के व्याज दराने दोन लाख रुपये घेतले.
त्यापोटी त्यांनी एक लाख 5 हजार रुपये परत केले. तसेच 30 जानेवारी 2014 ते 3 ऑगस्ट 2015 या काळात हणमंत कारंडे याच्याकडून चार टक्के व्याजदराने दिड लाख रुपये घेतले. त्यापोटी अडीच लाख रुपये परत दिले. व्याजाने पैसे घेत सोनावणे यांनी पत्नीच्या मामाची 19 गुंठे जागा कारंडे याला तीन वर्षाचे आत सोडवून घेण्याच्या अटीवर खुशखरेदी दिली होती.

हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी मुन्ना पटेल याच्या मध्यस्थीने स्वमालकीचा
टेम्पो तीन लाख 50 हजार रुपयांना विकला. त्यानंतर पटेल याने सोनावणे
यांना दोन लाख 45 हजार रुपयेच परत दिले. उर्वरित रक्कम त्याने स्वत:कडेच ठेवली. वेळावेळी मागणी करूनही ती परत दिली नाही. दरम्यानच्याच काळात सोनावणे यांनी सुभाष जावळे याच्याकडून 80 हजार रुपये घेतले. त्यापोटी दोन लाख 75 हजार इतकी रक्कम परत केली. व्याजाने घेतलेल्या एकुण21 लाख रुपयांपोटी 45 लाखांची परतफेड करुनही सर्व संशयीत आणखी पैसे देण्यासाठी त्यांना धमकावत होते. काल सायंकाळी त्यांनी धमकावत सोनावणे यांना चारचाकी वाहनातून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी याबाबत बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. उपनिरीक्षक दुधाणे तपास करत आहेत.

Web Title: crime filed against 5 sawakar