
Crime News : मोटरसायकलला कट मारण्याच्या किरकोळ कारणावरून तरुणाचा खून
सांगोला : मोटरसायकलला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना वाकी घेरडी (ता. सांगोला) येथे 22 मे रोजी रात्री आठच्या सुमारास घडली आहे. अमोल विश्वास लवटे (वय - 23 वर्षे, रा. वाकी घेरडी, ता. सांगोला) असे खून झालेल्या तरुणाचे नाव होय.
मोहन केराप्पा लवटे (रा. वाकी घेरडी, ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 22 मे रोजी अंदाजे पावणे आठ वाजण्याच्या सुमारास वाकी घेरडी चौकातून फिर्यादीचा चुलत भाऊ अमोल विश्वास लवटे हा महेश लवटे सोबत फॅशन मोटर सायकलवरून (क्रमांक - एम. एच - 13, ए.ए - 19 78) मुंबईला जाणाऱ्या मावशीला ज्वारी देण्यास जात होता.
यावेळी समोरून सांगोला ते वाकी घेरडी असे भरधाव वेगात वळणाच्या रस्त्यावरून येणाऱ्या इनोव्हा (क्रमांक - एम. एच - 12, सी. आर - 97 59) गाडीच्या चालक शरद शिवाजी पवार यांनी मोटरसायकलला कट मारल्याने मोटरसायकल रस्त्याच्या खाली उतरली.
मोटरसायकल चालक अमोल लवटे व इनोव्हा चालक यांच्यात वाद झाला. त्याचवेळी शिवाजी पवार गाडीतून उतरून शरद व भारत यांना अमोल यास धरून ठेवण्यास सांगून घरी जाऊन घरून येताना शांताबाई व विजुबाई यांना मिरची पूड घेऊन स्वतः लांब टोकदार धारदार चाकू घेऊन आला.
त्या दोघींनी अमोलच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्याचवेळी शिवाजी पवार याने अमोलच्या डाव्या बरगडीत चाकू खूपसून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला. यामुळे शिवाजी पवार, शरद शिवाजी पवार, भारत शिवाजी पवार, शांताबाई शिवाजी पवार व विजुबाई जाधव (सर्व रा. वाकी घेरडी, ता. सांगोला) याच्या विरुद्ध फिर्यादीने फिर्याद दिली आहे.
घटनेची माहिती समजताच सांगोल्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन गावातील वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप हे करीत आहेत.