हॉर्न वाजवल्याने शिपायाने त्याला मारले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी मारामारी, नदीत बूडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापार्श्वभुमीवर पाेलिसांकडून गंभीर दखल घेण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे समुपदेशनही करण्यात येत आहे.

कऱ्हाड ः महाविद्यालयाच्या आवारात हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून युवकास शिपायाने फायबर काठीने मारहाण केली. मंगेश प्रकाश माने (वय 22 रा. रैनाक गल्ली, कऱ्हाड) असे जखमी विद्यार्थ्यांचे नाव आहे. त्याने पोलिसात त्याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून संबंधित शिपायावर गुन्हा दाखल झाला आहे.
 
पोलिसांनी सांगितले, की मंगेश माने येथील एका महाविद्यालयात शिकत आहे. बोर्ड सर्टिफिकेट आणण्यासाठी मित्र पृथ्वीराज मदनेसह दुचाकीवरून तो महाविद्यालयात गेला होता. महाविद्यालयाच्या आवारात मंगेश दुचाकीचा हॉर्न वाजवताना तेथील शिपायाने त्याला अडवले. महाविद्यालयाच्या आवारात हॉर्न का वाजवतोस, अशी विचारणा करून त्याने गाडीची चावी काढून घेतली. दोन प्राध्यापकांनी मध्यस्थी केली. त्या वेळी चावी परत दिली. पुन्हा दुपारी अडीच वाजता मंगेश व त्याचा मित्र बोर्ड सर्टिफिकेट आणण्यास गेले होते. त्या वेळी त्यांनी संबंधित शिपायास विचारले. त्या वेळी त्या शिपायाने हातातील फायबरच्या काठीने मंगेशच्या कपाळावर जोरात मारले, असे फिर्यादीत म्हटले आहे. मंगेशने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. 

उंब्रजला मारहाणीत एक गंभीर जखमी 

उंब्रज : शाळेत झालेल्या मुलांच्या भांडणाचे पर्यवसान जबरी मारहाणीत होऊन एक जण गंभीर, तर दोन जण जखमी झाल्याची घटना येथे काल घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, तीन अल्पवयीन मुलांसह 15 जणांवर गुन्हा येथील पोलिसांत दाखल झाला आहे. 
बंडा शंकर गायकवाड (रा. उंब्रज) गंभीर जखमी झाला असून, आशितोष अशोक बैले (रा. उंब्रज), प्रकाश पांडुरंग सावंत (रा. अंधारवाडी) अशी जखमींची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलासह बंडा गायकवाड, आकाश राजाराम कुदळे, गुंड्या (पूर्ण नाव माहीत नाही) (सर्व रा. उंब्रज) अशी मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
 
प्रसाद पांडुरंग सावंत (रा. अंधारवाडी, ता. कऱ्हाड) याने दिलेल्या फिर्यादीनुसार ः काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शाळेत झालेली विद्यार्थ्यांची भांडणे मिटवून अंधारवाडी येथे घरी जात असताना बंडा गायकवाड, आकाश राजाराम कुदळे, गुंड्या (पूर्ण नाव माहीत नाही) यासह एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. उंब्रज) यांनी फिर्यादीस मारहाण करण्यास सुरुवात करून जमिनीवर पाडले. त्या वेळी गुंड्याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्‍यात मारहाण करून जखमी केले, असे दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तीन जणांवर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : साताऱ्याचा हवालदार नडला पुण्याच्या पोलिस अधीक्षकांना 

आशुतोष अशोक बैलै (रा. उंब्रज) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, काल फिर्यादी शाळेत गेला होता. त्या वेळी विनायक (पूर्ण नाव माहीत नाही) फिर्यादीच्या वर्गात येऊन बसला असता फिर्यादी विनायकला म्हणाला, आमचे प्रॅक्‍टिकल झाले, की येऊन बसा असे म्हणालेच्या कारणावरून विनायक फिर्यादीच्या अंगावर धाऊन गेला होता. दरम्यान काल रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्याचे मित्र बाजारपेठेत उभे होते. त्या वेळी चार ते पाच दुचाकीवरून अंधारवाडी येथील अविनाश राजेंद्र पवार (वय 20), गणेश प्रकाश भोसले (19), शंकर लक्ष्मण शितोळे (27), विकी संजय जाधव (20), संकेत उत्तम सकंपाळ (22), अविराज जिजाबा जाधव (21), अशितोष गणेश संकपाळ (20), प्रसाद पांडुरंग सावंत (19), ओमकार ऊर्फ राज पांडुरंग सावंत (21) यासह दोन अल्पवयीन मुले सर्व (रा. अंधारवाडी) यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी अविनाश पवार याने बंडा गायकवाड याच्या डोक्‍यात हातोडा मारून त्यास गंभीर जखमी केले. गंभीर जखमी बंडा गायकवाड याच्यावर कऱ्हाड येथील सह्याद्री रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दिलेल्या फिर्यादीवरून दोन अल्पवयीन मुलांसह अंधारवाडी येथील 9 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड तपास करीत आहेत.

दोन परप्रांतीय युवक कृष्णा नदीत बुडाले

दत्तनगर (कोडोली, ता. सातारा) : येथे पोहण्यासाठी गेलेले दोन परप्रांतीय युवक आज कृष्णा नदीत बुडाले. त्यातील एकाचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला आहे, तर दुसऱ्या युवकाचा शोध रात्री उशिरापर्यंत शिवेंद्रसिंहराजे रेस्क्‍यू टीमकडून सुरू होता. गंगाप्पा गारी आदर्श (वय 20, रा. कोनापूरम, अनंतपूर आंध्र प्रदेश) असे मृत सापडलेल्या युवकाचे नाव असून, सागर एस. सिद्धाप्पा (वय 19, रा. नेहरू कॉलनी, गौरी बिदनूर, कर्नाटक) याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

हेही वाचा :  ...म्हणून वडिलांनी घातला मुलावर कुऱ्हाडीचा घाव

पोलिसांनी दिलेल्या व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोडोलीनजीकच्या दत्तनगरात कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथील दहा ते 15 युवक एकत्र राहतात. हे युवक सेल्समन म्हणून काम करतात. आज (शनिवारी) दुपारी बाराच्या सुमारास त्यातील काही युवक कृष्णा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेले होते. कपडे धुवून झाल्यानंतर ते नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले. त्यातील सागर सिद्धाप्पा व गंगाप्पा आदर्श यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे बुडाले. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी गावातील पोलिस पाटील व पोलिसांना याबाबतची माहिती दिली. सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे व त्यांची टीम, तसेच शिवेंद्रसिंहराजे रेस्क्‍यू टीमचे अध्यक्ष चंद्रसेन पवार, अब्दुल सतार, देवा गुरव, गणेश निपाणे, आदित्य पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या जवानांनी नदीपात्रात उतरून बुडालेल्या युवकांचा शोध सुरू केला. त्या वेळी गंगाप्पा आदर्श याचा मृतदेह सापडला. मात्र, सागर सिद्धाप्पा याचा शोध रात्री उशिरापर्यंत लागला नाही. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

वाचा : ...म्हणून त्याने आईला मारले

हेही वाचा : रसिकांची नजर व नियत बदललीय रघुवीर खेडकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime News Of Satara District