सोलापूर जिल्हा गुन्हे वृ्त ः करकंबमध्ये अपघातात एक ठार, लऊळमध्य़े खून

सोलापूर जिल्हा गुन्हे वृ्त ः करकंबमध्ये  अपघातात एक ठार, लऊळमध्य़े खून

करकंब येथे अपघातात 
एक ठार, चार जखमी 

करकंब (जि. सोलापूर) ः पंढरपूर - टेंभूर्णी रोडवर करकंब (ता. पंढरपूर) येथे जगदंबा धाब्याजवळ ट्रॅक्‍टरला ओव्हरटेक करत असताना दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होवून एक जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. रमेश कृष्णा कोयले (वय 42, रा.शिडशिंगे, ता.माढा) असे मयताचे नाव आहे. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. 
हा अपघात सायंकाळी पावणेसात वाजणेचे सुमारास घडला असून तो हॉटेलच्या सीसी टीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. यातील मयत रमेश कोयले हे आपली पत्नी शकुंतला व मुलगा शुभम (वय 18) यांना घेवून दुचाकीवरुन सांगोल्याकडे चालले होते. ते करकंब येथे आले असता ट्रॅक्‍टरला ओव्हरटेक करत होते. त्याच वेळी समोरुन सत्यवान महादेव व्यवहारे (वय 35) व त्यांचा मुलगा प्रदीप (वय 11) हे दुचाकीवरुन येत होते. या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरात धडक बसली. यात रमेश कोयले यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी आणि मुलासह सत्यवान व्यवहारे व प्रदीप व्यवहारे गंभीर जखमी झाले. तातडीने सर्वांना करकंब येथिल खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सत्यवान व्यवहारे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले आहे. तपासासाठी पोलिसांनी ट्रॅक्‍टर चालकास ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत करकंब पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम चालू होते. 

अंगावर पावडर टाकून 
दीड लाख रुपये चोरले 

पंढरपूर ः अंगावर खाज येण्याची पावडर टाकून चोरट्यांनी एका व्यापाऱ्याकडील दीड लाख रुपये लंपास केले. ही घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास येथील जुन्या बस स्थानकासमोरील भागात घडली. 
या घटनेची समजलेली माहिती अशी की, जुन्या एसटी स्थानकासमोरील अखिलेश बेंगल स्टोअर येथील अखिलेश यादव हे आपल्या दुकानातील रोख रक्कम बॅंकेत भरण्यास निघाले होते. वाटेत पानटपरीजवळ ते मावा खाण्यास थांबलेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या अंगावर खाज येण्याची पावडर टाकली. अस्वस्थ झालेले यादव पुन्हा आपल्या दुकानात आले. तेव्हा त्यांच्याकडील पिशवीत ठेवलेले दीड लाख रुपये चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. अज्ञात चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. याप्रकरणी यादव यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलिस करत आहेत. 

लोखंडी जाळ्यांची चोरी 
पंढरपूर- मंगळवेढा रस्त्यावर वृक्षारोपण केल्यानंतर संरक्षणासाठी असलेल्या 10 लोखंडी जाळ्या अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्या. श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून पंढरपूर- मंगळवेढा रस्त्यावर वृक्षारोपण केले जात आहे. विविध प्रकारची झाडे लावून संरक्षणासाठी लोखंडी जाळ्या (ट्री गार्ड) लावल्या जात आहेत. गोपाळपूर, अनवली, सिद्धेवाडी परिसरात लावलेल्या प्रत्येकी सुमारे 700 रुपये किमतीच्या 10 संरक्षक जाळ्या (ट्री गार्ड) अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी मंदिर समितीचे कर्मचारी अरुण सलगर यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.  

लऊळ येथे अनोळखी व्यक्तीचा खून 
कुर्डु (जि. सोलापूर) ः लऊळ (ता माढा) येथे 30 ते 35 वर्षे वय असलेल्या अज्ञात व्यक्तीचा शस्त्राने खुन करून मृतदेह जाळुन टाकण्यात आल्याची माहिती शुक्रवारी (ता. 17) उघड झाली. लऊळ - शिराळ(मा) रोडवर जोशी वस्ती जवळ ही घटना घडल्याचे समोर आले अशून मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. 
अंकुश रामचंद्र जोशी यांच्या शेतातील खड्यात कडेला 30 ते 35 वर्षीय व्यक्तीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याची माहिती मारुती निवृत्ती नलवडे यांनी लऊळचे पोलीस पाटील चंद्रकांत लोकरे यांना दिल्यानंतर घटनेची खबर कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन कसुन पाहणी केली. मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मृत व्यक्तीच्या डोक्‍यात, पोटात, गळ्यावर व मानेवर शस्त्राने वार करून निघृन खून केल्यानंतर मृत व्यक्तीची ओळख पटु नये म्हणून व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने शरीर व चेहऱ्यावर इंधन टाकून जाळल्याचे दिसते. मृतदेह कुजक्‍या अवस्थेत सापडला असुन यांची परिसरात दुर्गंधी सुटली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
मृत व्यक्तीच्या पॅन्ट च्या खिशात अंदाजे 25 हजाराच्या 500 रुपयांच्या नोटा अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. मृताच्या डाव्या हाताला करंगळी व अंगठा वगळता तीन बोटे नसल्याचे व मृत्य व्यक्तीच्या अंगावर अर्धवट जळालेला निळ्या रंगाचा बारिक चौकडा शर्ट असुन काळ्या रंगाची पॅन्ट असल्याचे सांगितले. खुनाचा नेमका हेतू लूटमार नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास पोलिस अधिक्षक रविंद्र डोंगरे करीत आहेत. 

अंगावर आढळून आलेल्या जखमावरून खून झाला असल्याचे स्पष्ट आहे. खून किती दिवसांपुर्वी झाला आहे हे डॉक्‍टरांच्या आहवाला वरुनच कळेल. गेल्या चार - पाच दिवसापासून गायब असलेल्या व्यक्तीची माहिती असल्यास करमाळा उपविभागीय पोलीस कार्यालयाशी संपर्क करावा. 
डॉ. विशाल हिरे, उपविभागीय पोलीस अधिक्षक

महामार्गाच्या कामाला विरोध करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल 
सांगोला (जि. सोलापूर) : राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला विरोध करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. बाहुबली गवळी, पिंटू यादव व त्याची बहीण या तिघांनी जी. आर. इन्फ्रा प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेडचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रदीपकुमार सिंग व त्यांच्या साथीदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना दगडफेक करून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता.17) वाटंबरे (ता. सांगोला) येथे घडली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 
सांगोला तालुक्‍यातून रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. याबाबत जी. आर. इन्फ्रा प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेड कंपनीस 31 डिसेंबर 2018 रोजी काम सुरू करण्याचा आदेश प्राप्त झाला आहे. प्रदीपकुमार सिंग, रामपाल पात्रा, प्रिन्स श्रीवास्तव या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संदीप गोडसे, मन्सूर मुलाणी, आकाश आलदर, राजू चौधरी, कोमल चव्हाण, पप्पू यादव, बिजेंदर चौधरी, संजय चौधरी, वशिष्ठ राम, मुन्ना कुमार असे कर्मचारी वाटंबरे (ता. सांगोला) हद्दीतील बाहुबली ज्ञानू गवळी यांच्या मालकीच्या जमीन गट नंबर 155 मधून रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणचे काम करीत होते. यावेळी बाहुबली ज्ञानू गवळी त्याचा जावई पिंटू यादव आणि यादव यांची बहीण हे तिघेजण येथे आले. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून तिथून निघून जा नाहीतर तुम्हाला सर्वांना खल्लास करून टाकीन अशी धमकी दिली. त्याचबरोबर पिंटू यादव यांनीही माझ्या सासऱ्याच्या जागेवरून निघून जा अन्यथा तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, असा सर्वांना दम भरला. 
यावेळी सर्वांना तिघे मिळून दगड मारू लागले. पिंटू यादव याने मारलेला दगड प्रदीपकुमार सिंग यांच्या पायाच्या पोटरीवर लागल्याने ते जखमी झाले तर रामपाल पात्रा यांनाही कानाखाली चापट मारल्याने घाबरलेले सर्व अधिकारी, कर्मचारी घटनास्थळावरून पळून गेले. याबाबत प्रदीपकुमार सिंग यांनी सांगोला पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार बाहुबली गवळी, पिंटू यादव व त्याची बहीण अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पोलिस करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com