करणी काढण्याच्या बहाण्याने नेले मुलीला पळवून अन्....

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

मुलीची लागीर काढण्यासाठी कुटुंबातील सर्वांना एका खोलीत धार्मिक ग्रंथाचे वाचन करण्यास सांगितले. त्यानंतर तो मुलीला घेऊन बाहेर आला. बराच वेळ झाला तरी अब्दुलराही का बोलवत नाही म्हणून कुटुंबातील सर्वजण खोलीतून बाहेर आले. तेव्हा अब्दुलराही तिला घेऊन पळाल्याचे निदर्शनास आले.

सांगली - करणी काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी अब्दुलराही मुसा शेख (वय 36, रा. बीड) याला बारा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्‍वर यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे ऍड. माधव कुलकर्णी यांनी काम पाहिले.

अधिक माहिती अशी, मिरज परिसरात 2013 मध्ये हा गुन्हा घडला. एका कुटुंबातील महिला पती आणि शेजारील लोकांशी सतत भांडण करत होती. त्यामुळे तिचा पती वैतागला होता. त्याने तडसर येथील हमीद मुल्ला याला हा प्रकार सांगितला. हमीद याने त्याला "तुझ्या बायकोला लागीर झाले असेल ती काढली तर व्यवस्थित वागेल' असे सांगितले. त्यानंतर हमीद याने आरोपी अब्दुलराही हा मौलाना असून तो लागीर काढण्याचे काम करत असल्याचे सांगून त्याला बीडमधून बोलवून घेतले. अब्दुलराही मिरजेत आला असताना त्याचवेळी या कुटुंबात अल्पवयीन मुलगी सुट्टीसाठी आली होती. तेव्हा अब्दुलराही याने तिला देखील लागीर झाली असून लागीर काढलीच पाहिजे असे सांगितले. मुलीची लागीर काढण्यासाठी कुटुंबातील सर्वांना एका खोलीत धार्मिक ग्रंथाचे वाचन करण्यास सांगितले. त्यानंतर तो मुलीला घेऊन बाहेर आला. बराच वेळ झाला तरी अब्दुलराही का बोलवत नाही म्हणून कुटुंबातील सर्वजण खोलीतून बाहेर आले. तेव्हा अब्दुलराही तिला घेऊन पळाल्याचे निदर्शनास आले. सर्वत्र शोध घेऊन त्याच्याविरूद्ध मिरज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

हेही वाचा - मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर थरारक अपघात; चौघे जागीच ठार 

मिरज पोलिसांनी केली मुलीची सुटका

दरम्यान मुलीला घेऊन अब्दुलराही मिरज बसस्थानकावर आला. तेथून बसने मुलीला पुणे येथे घेऊन गेला. औरंगाबादला नातेवाईकाकडे तिला घेऊन गेला. तिथे त्याने बलात्कार केला. नंतर मनमाड येथून दरभंगा येथे जात असताना इलाहाबाद रेल्वे
स्थानकावर मिरज पोलिसांनी त्याला पकडून मुलीची सुटका केली. मुलीची विचारपूस केल्यानंतर तिने जबरदस्तीने पळवून नेऊन बलात्कार केल्याचे सांगितले. तिचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला. तपास करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारतर्फे ऍड. कुलकर्णी यांनी दहा साक्षीदार तपासले. साक्षी पुराव्याच्या आधारे आरोपी अब्दुलराहीला बारा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

हेही वाचा - सुखद ! निराधार आजीला मिळाले घर, अन् नात.. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminal Gets Servitude Punishment In Rape Case