लूटमार करणारा संदीप पाटील स्थानबद्ध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

पाच महिन्यांत चौथी कारवाई.. 
पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी पदभार स्वीकारून गेल्या आठवड्यात एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षभरात 10 जणांवर स्थानबद्धची कारवाई करण्यात आली आहे. या वर्षातील ही चौथी कारवाई आहे. सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुंड, समाजविघातक कृत्य करणाऱ्यांची, अवैध व्यवसाय करणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून पुढील कार्यवाही चालू आहे.

सोलापूर : फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार संदीप ऊर्फ भय्या लक्ष्मण पाटील (वय 30, रा. गायत्रीनगर, मुरारजी पेठ, सोलापूर) यास स्थानबद्ध करण्यात आले आहे. संदीप याने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी त्याचे जीवन गुन्हेगारीस वाहून घेतले आहे. तो गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याने पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी त्याच्यावर स्थानबद्धची कारवाई केली आहे. 

तो परिसरातील लोकांना शस्त्राने धमकावणे, मारहाण करून बळजबरीने लुटणे, दहशत निर्माण करत आहे. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली आहे. त्याच्यावर शरीराविषयी व मालाविषयी सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी 2013 मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई आणि सन 2014 मध्ये एक वर्षाकरिता तडीपार केले होते. त्याने तडीपारचा कालावधी उपभोगल्यानंतर लगेच जबरी चोरीचा गंभीर गुन्हा केला. डिसेंबर 2017 मध्ये संदीप याने साथीदारासह बाळे परिसरात दहशत निर्माण करून एकास मारहाण केली. दुचाकीवर पेट्रोल टाकून आग लावून नुकसान केले आणि त्याच्याकडील रोकड लुटली. या गुन्ह्यातून जामिनावर मुक्त झाल्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीतच म्हणजे मार्च 2018 मध्ये संदीप याने साथीदारांसह मुरारजी पेठेत एकास मारहाण, शिवीगाळ करून त्याच्याकडील दुचाकी व रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांचा सातत्याचा विचार करून पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी त्याच्यावर स्थानबद्धची कारवाई केली आहे. त्यास पुण्यातील येरवडा कारागृहात दाखल करण्यात येत आहे. 

पोलिस आयुक्त महादेव तांबडे, पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ गुरव, पोलिस कर्मचारी राजू ओहोळ, नवनीत नडगेरी, विनायक संगमवार, सुदीप शिंदे, अक्षय जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

पाच महिन्यांत चौथी कारवाई.. 
पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी पदभार स्वीकारून गेल्या आठवड्यात एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षभरात 10 जणांवर स्थानबद्धची कारवाई करण्यात आली आहे. या वर्षातील ही चौथी कारवाई आहे. सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुंड, समाजविघातक कृत्य करणाऱ्यांची, अवैध व्यवसाय करणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून पुढील कार्यवाही चालू आहे.

Web Title: criminal Sandip Patil arrested in Solapur