गुंड-भाईंचा पोलिस ठाण्यात कोंबडा !

हेमंत पवार
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

न कळत काही वेळेला तरुणांकडून चूका हाेतात. त्यातून त्यांच्यावर गुन्हा दाखल हाेताे. यामुळे तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी अशा स्वरुपाच्या कारवाया केल्या जात आहेत.
 

कऱ्हाड ः सोशल मीडियावरील भाईंचा पोलिस ठाण्यात आणून "पोलिसी खाक्‍या' दाखवत त्यांचा "कोंबडा' करण्याबरोबर समुपदेशनातून त्यांचा "ब्रेनवॉश' करण्याचेही काम पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे जे तरुण गुंडांच्या सावलीखाली राहत होते, त्यांचे डोळे उघडून ते आता सोशल मीडियावर दिलगिरीही व्यक्त करत आहेत. 

कऱ्हाड शहर आणि परिसरातील गुंडगिरी सर्वपरिचित आहे. त्या गुंडांची 
छायाचित्रे, व्हिडिओ तयार करून ते "व्हायरल' करण्याचे प्रमाण सध्या महाविद्यालयीन तरुणांकडून वाढले आहे. त्यामुळे संबंधित गुंडांना आपोआप प्रसिध्दी मिळून ते तरुणांसाठी मोठे "भाई' होत आहेत. गुंडांना-भाईंना त्यातून प्रसिध्दी मिळत असली तरी कॉलेजला जाणाऱ्या तरुणांत मात्र त्यांची बिजे रोवली जावून तीही वाया जाण्याच्या मार्गावर येत आहेत.

आई-वडिलांना अंधारात ठेवून अभासी दुनियेतील मित्रांच्या संगतीतून तरुणांकडून हे कृत्य सुरू असते. त्याचा विचार करून सामाजिक बांधिलकीतून अशा गुंडांच्या नादाला लागून स्वतःचे आयुष्य बरबाद करून घेणाऱ्या या युवकांना वेळीच सावध करून त्यांचा "ब्रेनवॉश' करण्यासाठी पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी पुढाकार घेतला आहे.

त्याअंतर्गत संबंधित गुंड टोळ्यांचे सोशल मीडियावरील फॉलोअर्स शोधून त्यांच्यावर कारवाईची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. त्याअंतर्गत संबंधित गुंडांचे फॉलोअर्स, स्वतःचे छायाचित्र व व्हिडिओ गुंडाबरोबर समाविष्ट करून ते "फॉर्वर्ड' करणारे युवक, गुंडांचे वाढदिवस व अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ काढून व्हायरल करणारे युवक पोलिस ठाण्यामध्ये आणून त्यांना "पोलिसी खाक्‍या' दाखवण्याबरोबरच त्यांचा "कोंबडा' करून "ब्रेनवॉश' करण्याची कार्यवाही सध्या पोलिस ठाण्यात सुरू आहे.

त्याअंतर्गत करण्यात आलेल्या कारवायांतून संबंधित युवकांनी असे व्हिडिओ, छायाचित्रे स्वतः डिलीट करून "मी एक सामान्य तरुण आहे, माझ्याकडून नकळतपणे संबंधित पोस्ट व्हायरल झाल्या होत्या, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे' अशा पोस्ट टाकल्या आहेत. त्यामुळे पोलिसांतूनही कारवाईचे समाधान व्यक्त होत आहे.

कऱ्हाडधील गुंडांचे फॉलोअर्स हे महाविद्यालयीन तरुण जास्त आहेत. त्यांच्या नादाला लागून स्वतःचे शैक्षणिक आयुष्य उद्‌ध्वस्त करून घेणाऱ्या तरुणांना त्यांच्यापासून परावृत्त करण्यासाठी पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी सुरू केलेले काम स्तुत्य आहे. तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी अशा कारवायांची खरच गरज आहे.

- धीरज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सातारा. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminals Are Strict Warned In Police Station