मिरजेत गुन्हेगारांच्या म्होरक्‍यांनाही निवडणुकीचे वेध 

प्रमोद जेरे
सोमवार, 26 मार्च 2018

पोलिस ठाण्यातील तळागाळातील यंत्रणा या नेत्यांच्या बटीक झाल्या आहेत. गल्लीबोळातील फाळकुट गुंड राजकीय प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी पोलिसांच्याच शिडीचा वापर करीत आहेत. पोलिसांची फौजच अशा प्रकारे फंदफितुरी करीत असेल तर काम कसे करायचे असा अधिकाऱ्यांना प्रश्‍न पडला आहे. सत्तेच्या माध्यमातून सध्या निवृत्तीच्या मार्गावरील अनेक नगरसेवकच सध्या पाकीटमार, डिझेल पेट्रोल चोरीसारख्यांच्या टोळ्यांचे माफिया झाले आहेत. खासगी सावकारीतही अनेकांनी पीएच.डी. प्राप्त केली आहे

मिरज - आगामी महापालिका निवडणूक लढवण्यासाठी शहरातील अनेक गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरके पुढे सरसावले आहेत. दारू गुत्तेचालक, मटका बुकी, झोपडपट्टीदादा, इंधन चोर, चंदन चोर अशी बिरुदे मिरवणाऱ्यांना आता महापालिका सभागृहात जाऊन समाजसेवा करण्याचा ध्यास लागला आहे. त्यासाठी त्यांच्या चमच्यांकडून शहरात इमेज बिल्डिंगचे काम सुरू आहे. अनेकांनी समाजमाध्यमांचा आसरा घेऊन मार्केटिंग सुरू केले आहे. 

मिरजेचा गुन्हेगारीतील कुलौकिक नवा नाही. या गुन्हेगारांच्या मदतीने अनेक राजकीय चेहऱ्यांनी शहरात बस्तान बसवले आहे. त्यासाठी पोलिसांचाच वापर केला जातो. ज्यांना कारागृहात टाकायचे त्यांच्यासाठी पोलिस काम करीत असल्याचे विदारक चित्र अनेक प्रसंगात दिसून आले आहे. एका गटातील गुन्हेगांराना वेठीस धरण्यासाठी दुसऱ्या गटाकडून पोलिसांना सुपाऱ्या दिला जातात. पोलिसही ते काम इमाने इतबारे पार पाडतात. 

मिरजेतील राजकारणाचे वाढते गुन्हेगारीकरण यावेळी टिपेला जायची शक्‍यता आहे. अगदी ब्राह्मणपुरीसारख्या सभ्य म्हणवल्या जाणाऱ्या लोकवस्तीचाही याला अपवाद नाही. पोलिस किंवा अन्य प्रशासकीय यंत्रणांमधील कोणतेही काम असे गुन्हेगार नगरसेवक आपली कामे जलद करू शकतात असा लोकांचा विश्‍वास वाढत चालला आहे. त्यामुळे लोक अडचणीवेळी पोलिस किंवा प्रशासनाकडे नव्हे तर आधी या गुन्हेगारांच्या आश्रयाला जातात. या गुन्हेगारांचेही पोलिस ठाण्यापासून ते महापालिकेपर्यंत अनेक यंत्रणांपर्यंत वजन आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारांच्या टोळ्या याच सरकारी यंत्रणा आणि समाजामधील एक भक्कम दुवा बनल्या आहेत. त्याचाच लाभ घेत या म्होरक्‍यांनी आतापासूनच विरोधी गटातील कामाच्या पोरांना कारवायांमध्ये अडकवण्याचा सपाटा लावला आहे. आधीच्या गुन्ह्यात आणखी भर टाकून कदाचित आगामी निवडणुकांपर्यंत त्यांना हद्दपारीपर्यंत न्यायचा इरादा आहे. त्यासाठी काही प्रस्थापित राजकीय नेते सध्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. पोलिस ठाण्यातील तळागाळातील यंत्रणा या नेत्यांच्या बटीक झाल्या आहेत. गल्लीबोळातील फाळकुट गुंड राजकीय प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी पोलिसांच्याच शिडीचा वापर करीत आहेत. पोलिसांची फौजच अशा प्रकारे फंदफितुरी करीत असेल तर काम कसे करायचे असा अधिकाऱ्यांना प्रश्‍न पडला आहे. सत्तेच्या माध्यमातून सध्या निवृत्तीच्या मार्गावरील अनेक नगरसेवकच सध्या पाकीटमार, डिझेल पेट्रोल चोरीसारख्यांच्या टोळ्यांचे माफिया झाले आहेत. खासगी सावकारीतही अनेकांनी पीएच.डी. प्राप्त केली आहे. 

लिस्टची दहशत 
मिरज शहरातील अनेक पोलिस ठाण्यात सध्या गुन्हेगारांची लिस्ट केली जात आहे. याकामी पोलिसांची फौजच गुंतली आहे. आगामी निवडणुकीत त्रासदायक किंवा आव्हानात्मक ठरतील अशा गुन्हेगारांना लिस्टवर घेतले जात आहेत. खरे तर हे काम पोलिसांच्या गुप्त कार्याचा भाग. मात्र त्याचा गाजावाजा करून पोलिसांकडून दहशत निर्माण केली जात आहे. त्याचा बोभाटा शहरभर झाला आहे. हा बोभाटा कोणी केला असावा हे वेगळे सांगायची गरज नाही. ही भीती दाखवून काही कारभारी जाणीवपूर्वक असे काटावरचे कार्यकर्ते आपल्याकडे वळवत आहेत. 

Web Title: criminals eye for political space in miraj