गुन्हेगार सुर्वेवर आणखी तीन गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

कुपवाड - तरुणीच्या विनयभंगप्रकरणी कुपवाड पोलिसांच्या अटकेत असलेला गुन्हेगार संदीप सुर्वे याच्यावर विनयभंग आणि खंडणीचे आणखी तीन गुन्हे दाखल झाले. त्याचा साथीदार प्रकाश केदारी माने (वय ३६, शांत कॉलनी) यालाही पोलिसांनी अटक केली. 

कुपवाड - तरुणीच्या विनयभंगप्रकरणी कुपवाड पोलिसांच्या अटकेत असलेला गुन्हेगार संदीप सुर्वे याच्यावर विनयभंग आणि खंडणीचे आणखी तीन गुन्हे दाखल झाले. त्याचा साथीदार प्रकाश केदारी माने (वय ३६, शांत कॉलनी) यालाही पोलिसांनी अटक केली. 

अधिक माहिती अशी - संदीप एका वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगून सांगलीसह जिल्ह्यात वावरत होता. त्याचा फायदा घेऊन बामणोली (ता. मिरज) येथील युवतीला त्याने फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले; परंतु त्याच्या कारनाम्यांची माहिती मिळाल्यानंतर युवतीने लग्नास नकार दिला. तेव्हा त्याने युवतीची सोशल साइटवरून अश्‍लील मेसेजद्वारे बदनामी केली. त्रासाला कंटाळून युवतीने वडिलांसह कुपवाड पोलिस ठाण्यासमोर काल दुपारी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेनंतर दुर्घटना टळली. पीडित युवतीच्या फिर्यादीनंतर काल सायंकाळी सुर्वेवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. 
दरम्यान, सुर्वेवर आज आणखी तीन गुन्हे दाखल करण्यात आले. काल आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पीडित युवतीच्या बहिणीचाही त्याने विनयभंग केल्याची फिर्याद दाखल झाली. गेल्या आठवड्यात पीडित युवतीची बहीण वडापाव आणण्यासाठी गावात आली होती. त्यावेळी सुर्वे आणि साथीदार माने दुचाकीवरून आले. दोघांनी तिला अडवले. अंधाराचा फायदे घेत विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. सुर्वेसह मानेवर बाल लौंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
सुर्वेविरुद्ध खंडणीचेही दोन गुन्हे दाखल करण्यात आले. सुर्वे व मानेने पीडित युवतीच्या नातेवाइकांच्या कंपनीत जाऊन पाच लाखांची खंडणी मागितली. ‘तुमच्यामुळेच आमचे लग्न होत नाही, आमचे लग्न लावून द्या, अन्यथा बदनामी करू’, अशी धमकी दिली. बदनामी नको असल्यास पाच लाख द्या, अशी मागणी केली, अशीही एक फिर्याद दाखल झाली आहे. दुसऱ्या फिर्यादीनुसार सुर्वेने पत्रकार असल्याचे सांगून कुपवाड औद्योगिक वसाहतीतील एका कारखानदाराकडूनही १५ हजारांची खंडणी मागितली होती. मित्राच्या मदतीने कारखान्यात घुसून कारखान्यातील कागदपत्रात घोळ आहे, ती माहिती प्रसारित करेन, अशी धमकी दिली व खंडणी मागितली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, सुर्वेला आज न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक रूपाली कावडे तपास करीत आहेत.    

गुन्हेगार संदीप सुर्वेवर कडक कारवाई करा
गुुन्हेगार संदीप सुर्वेवर कडक कारवाई करा, अशी मागणी घेऊन बामणोली ग्रामस्थांनी आज सायंकाळी कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. पोलिस अधिकाऱ्यांना घेराओ घालून सुर्वेच्या कारवाईंना पाठीशी घातल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा असा इशारा दिला. अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांना दिली. बामणोलीचे उपसरपंच अंकुश चव्हाण, सावळाराम शिंदकर, प्रकाश घुटुकडे, संजय मोटे, प्रशांत बामणेंसह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

‘मोक्‍का’साठी हालचाली...
संदीप सुर्वे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर कुपवाड औद्योगिक वसाहत, विश्रामबाग, सांगली शहर आणि संजयनगर पोलिस ठाण्यांत बाल लैंगिक अत्याचारप्रतिबंधक कायदा, मारामारी, खंडणी यांसारखे तेरा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने एका वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत अनेकांना गंडा घातल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्‍का) नुसार कारवाईच्या हालचाली सुरू असल्याला पोलिसांनी दुजोरा दिला.

Web Title: Criminals Surve filed three more cases