पायाचा चिखल धुवायला गेला अन् मगरीने घात केला

sangali
sangali

सांगली : मगरीने आकाश जाधव ऊर्फ गुंड्या या बारा वर्षांच्या मुलावर हल्ला केल्याच्या घटनेने मौजे डिग्रजकरांच्या उरात धडकी भरली आहे. गाव सुन्न आहे. कृष्णा नदीपासून शे-दोनशे मीटर अंतरावर बाळासाहेब लांडे यांच्या शिवारात पडलेल्या वीटभट्टी कामगारांच्या झोपड्यांत अश्रुंचा बांध फुटलाय. सकाळी तांड्यावर पोहोचलो. 

आकाशचा मृतदेह अजून हाती लागायचा होता. दोन बोटीतून शोध सुरू होता. त्याची आई सुमन रडून घायकुतीला आली होती... पूजा आणि काजल या बहिणी भेदरल्या होत्या. बाप हमसून रडत होता. पोटचा गोळा डोळ्यादेखत मगरीनं नेला... पोरगं जिवंत असंल याची हमी नाही. आईच्या डोळ्यातून धारा थांबत नव्हत्या... ती माऊली रडून रडून सांगत होती. जे काही काल घडलं, त्या वेळेला दोष देत होती. गुंड्या, गुंड्या म्हणून ओरडत होती. 
येथे मध्यरात्री एक वाजता वीजभट्टीचं काम सुरू होतं आणि ऊन तापेपर्यंत सुरू राहतं. सकाळी दहाला सुटी करून सारे पालावर परतात. काल सुमन यांनी भट्टीवरून परतल्यानंतर चुलीवर पाणी ठेवलं, गुंड्याला आंघोळ करून घ्यायला सांगितली... पण गुंड्याच्या भाळी वेगळंच लिहिलं होतं. तो हट्टाला पेटला, मी नदीवर पोहायला येणार म्हणाला. सुमन म्हणाल्या,""आज नको, उशीर झालाय. घरातच आंघोळ कर.'' गुंड्या रडायला लागला. त्या माऊलीनं दोन लेकी आणि गुंड्याला सोबत घेऊन नदी गाठली.

कपडे धुवायला दररोज चार-पाच महिला सोबत असतात. आज त्या आधीच जाऊन आल्या होत्या. सुमन आणि लेकरं नदीवर गेली. गुंड्या पाण्यात उतरला. बराच वेळ पोहला. आंघोळ उरकून बाहेर आला. तो शौचास गेला... तोवर सुमन यांचे धुणे आवरले होते. डोक्‍यावर धुणे घेऊन त्या वर आल्या... पण... गुंड्याच्या पायाला चिखल माखला होता... तो म्हणाला,""पाय धुवून आलोच...'' तो खाली गेला अन्‌ क्षणात महाकाय मगरीने त्याच्यावर झडप घातली... तो प्रसंग सांगताना, एका आईचं काळीज पिळवटून निघत होतं... 
नदीच्या पलीकडून एक शेतकरी हे पाहत होता. पहिल्यांदा तो ओरडला. त्या आवाजाने सुमन यांनी मागे वळून पाहिलं... मगर जबड्यात पोराला घेऊन निघाला होती. गुंड्या... गुंड्या म्हणून त्या ओरडू लागल्या. दोघी बहिणी ओरडू लागल्या. बाजूचे लोक ओरडले. त्या तिघींनी नदीकाठावरील पायवाटेवरून मगरीच्या मागे निघाल्या. मगर झपाट्याने गेली आणि गायब झाली... 

मगरीची माहिती होती 
आकाशची आई सुमन यांना या भागात मगर आहे, याची माहिती होती. ती दिसलीही होती. काही दिवसांपूर्वी एक शेळी मगरीने पळवली होती. पण, मगरीची भीती वाटावी, असे काही नव्हते. त्यामुळे आम्ही धुणी धुवायला नेहमी जायचो, असे त्यांनी सांगितलं. 

1 जूनला परतणार होते 
आकाश निंबळक येथील सरकारी कन्नड शाळेत शिकायचा. तो पाचवीतून आता सहावीत गेला होता. 1 जूनला शाळा सुरू होणार होती. सारे कुटुंब त्याआधी गावी परतणार होते, मात्र त्याआधी काळाने घाला घातला. 

दुष्काळापुढे हतबल 
निंबळक येथे भीषण दुष्काळ आहे. पिण्याची पाण्याची मारामार आहे. त्यामुळे तिकडचे बहुतेक लोक जगण्यासाठी भटकत आहेत. जाधव कुटुंब याआधी ऊस तोडीसाठी गेले होते. तेथून वीटभट्टी कामावर आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com