अबब ! युवकांनी पकडली मगर

विलास साळूंखे
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

मागील तीन महिन्यांपासून मगरीला पकण्यात यश येत नव्हते. अखेर युवकांनी पकडून
वन विभागाकडे सुपूर्द केले.

भुईंज (जि. सातारा) : चिंधवली (ता. वाई) येथे लोकवस्तीत आलेली महाकाय मगर युवकांनी धाडसाने पकडून वन विभागाच्या ताब्यात दिली. युवकांनी केलेल्या या धाडसाचे परिसरात कौतुक होत आहे.
 

मागील तीन महिने चिंधवली, पाचवड, भुईंज परिसरात महाकाय मगर वावरत असल्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. या पार्श्‍वभूमीवर वाई तालुक्‍याच्या वन विभागाचे अधिकारी महेश झांजुर्णे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी मगरीच्या शोधासाठी अनेक दिवस घालवले तरी मगर सापडली नाही.

अखेर रविवारी (ता. 18) रात्री दहा वाजता दहा फूट लांब व 200 किलो वजनाची मगर किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यानजीक चिंधवली रस्त्यावर असणाऱ्या एकविरा देवीच्या मंदिराशेजारील मोरे वस्तीनजीक असलेल्या ओढ्यावरील छोट्याशा बंधाऱ्यातून ही मगर लोकवस्तीत येत असताना कुत्र्यांच्या नजरेत आली.

मगरीस निर्जनस्थळी साेडणार

जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजाने सर्व युवक व ग्रामस्थ जागे होऊन एकत्रित आले व दोरीच्या साह्याने मगरीला पकडून एका झाडास अडकवून धरले व वाई वन विभागास कळविले. तालुका वन अधिकारी महेश झांजुर्णे हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोचले व मगरीला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करून निर्जनस्थळी सोडण्यासाठी रवाना केली.

...यांनी पकडली मगर 

राजाराम मोरे, दत्तात्रय मोरे, केतन पवार, ओंकार पवार, सचिन मोरे, शिवाजी पवार या ग्रामस्थांनी मगर पकडली व वन विभागाचे तालुका अधिकारी महेश झांजुर्णे, वनपाल संग्राम मोरे, लक्ष्मण देशमुख, वसंत गवारी, श्रीकांत चौधरी, अजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन मगर ताब्यात घेऊन वाहनात भरून घेऊन मार्गस्थ झाले. 

महिला वनपाल अग्रभागी 

मगर पकडण्याच्या मोहिमेत भुईंज कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला वनपाल रजिया शेख यांच्या धाडसाचे पाहणाऱ्यांत चर्चेचा विषय ठरला. 
पकडलेल्या मगरीला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर मोबाईलमध्ये छायाचित्र घेण्यासाठी युवकांनी गर्दी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crocodile Caught By Youth