सांगली जिल्ह्यात क्रोकोडाईल पार्कची संधी

सांगली जिल्ह्यात क्रोकोडाईल पार्कची संधी

कृष्णाकाठावर निरीक्षण मनोरा - जिल्ह्यात कृषी पर्यटनांच्या संधी निर्माण होतील

कृष्णा ही जिल्ह्याला लाभलेली भाग्यदायिनी असून सारा विकास तिच्यावरच झालाय...या जिल्ह्यात पाहण्यासारखे काही नाही, ही खंत कृष्णेतील मगरीच दूर करतील! देशात फक्‍त चेन्नईत क्रोकोडाईल पार्क आहे. आपल्याकडे रोज मगरींच्या हल्ल्याची बातमी कानी येते; पण ही आपत्ती पर्यटनासाठी संधी म्हणून पाहिली तर सांगलीत काय पाहायचे, याचे उत्तर आपोआप मिळेल. पण अशा कल्पना साकारण्यासाठी इच्छाशक्‍ती असलेले नेते आणि कल्पक अधिकारी हवेत!

गेल्या काही दिवसांत मगरींच्या हल्ल्यांच्या बातम्यांनी जनमानस भयभीत झाले. सुमारे एक हजार मगरी कृष्णेच्या या पट्ट्यात आहेत. कपडे धुणाऱ्या, मेंढपाळांवर हल्ले झाल्याने संपूर्ण कृष्णाकाठावर भीतीयुक्त चर्चा होती.

अगदी सांगलीत आयर्विन पुलाच्या परिसरातही मगरीचा वावर सध्या नित्यपणे दिसतो आहे. यामागची कारणमीमांसा समजून घेऊन समाजाचे वर्तन होणे गरजेचे आहे. जंगलात वाघाचे जे स्थान आहे तेच मगरीचे पाण्यात आहे. मगरीचा अधिवास वाहत्या गढूळ पाण्यातच असतो. गेल्या काही वर्षांत मगरीचा संख्या वाढली असे सर्रास म्हटले जाते, प्रत्यक्षात तसे मानावे यासाठी कोणतेही पुरावे नाहीत. कारण मगरींचा अधिवास सुरक्षित झाला आहे. त्यांच्या प्रजननासाठी विशेष वेगळे प्रयत्न केले आहेत असे काहीही नाही. उलट मगरींचा अधिवास धोक्‍यात यावा असेच प्रकार माणसांकडून झाले आहेत. पूर्वी पाणवठ्याच्या भागात मगरींचा वावर फारसा नसे. मात्र अलीकडे पाणवठ्यावरही मगरी दिसतात. त्यातले सर्वात पहिले कारण म्हणजे नद्यांच्या पोटात जाऊन यांत्रिकी बोटीद्वारे होणारा वाळू उपसा. कऱ्हाडपासून कर्नाटक, आंध्रपर्यंतच्या कृष्णेच्या काठावर वाळू शिल्लकच उरलेली नाही. त्यामुळे नदीच्या पोटात जाऊन सर्रास वाळूउपसा सुरू आहे. केवळ सांगली जिल्ह्यात तीस ते चाळीस ठिकाणी यंदाही यांत्रिक बोटीने वाळूउपसा सुरू आहे. त्यामुळे निर्जन ठिकाणी असणारा मगरींचा अधिवास धोक्‍यात आला आहे. त्या सैरभैर झाल्याने सर्रास त्यांचा संपूर्ण नदीपात्रात मोकाट वावर दिसतो आहे. मात्र मगरींबद्दलची माहिती समजून घेणे हा जसा आपल्या गरजेचा भाग आहे तसाच मगरीचे अस्तित्व ही संधी मानून त्याचे रोजगारातही रूपांतर शक्‍य आहे. जगभरात असे काही प्रयोग आणि आपल्याकडच्या शक्‍यतांवर मांडलेली तज्ज्ञांनी मांडलेली मते--

भारतात मद्रास क्रोकोडाईल बॅंक ट्रस्ट (एमसीबीटी) या मूळच्या अमेरिकन रोम्युल्स व्हिटेकर याने विकसित केले आहे. हा माणूस त्यासाठी भारतातच स्थायिक झाला. मुख्यतः हे सरपटणाऱ्या प्राण्यांसाठीचे पार्क आहे.

तामिळनाडूतील स्थानिक इरुला हे आपल्याकडच्या गारुड्यांप्रमाणे असलेली जमात. या १९७२ च्या वन्य जीव संरक्षक कायद्याने प्राण्यांच्या खेळांवर बंधने आली आणि या जमातीच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे इरुलांची सहकारी संस्था स्थापन करून त्यांच्या सभासदांकडून सर्प विष काढून त्याचा पुरवठा प्रतिविष औषध प्रयोगशाळांसाठी केला जाऊ लागला. व्हिटेकर यांनी पुढाकार घेऊन ही सारी कामे केली. त्यांनी मगरींच्या पुनर्वसासाठी या पार्कद्वारे विशेष प्रयत्न केले आणि आता एक देशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असे क्रोकोडाईल पार्क तयार झाले आहे.

आपल्याकडेही असे क्रोकोडाईल पार्क करण्याच्या शक्‍यताही तपासल्या पाहिजेत. मात्र मगर दर्शन हा पर्यटन रोजगाराचे साधन ठरू शकते. 

कृष्णाकाठावर ग्रामपंचायतींच्या सहकार्याने निरीक्षण मनोरे उभारल्यास दुर्बिणीद्वारे मगरींचे दर्शन शक्‍य आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि वन्य प्राण्यांबद्दलची जागृती निर्माण होणार आहे. हरिपूर, भिलवडी, माळवाडी येथे नदीकाठी प्रायोगिक तत्त्वावर असे मनोरे उभारणे शक्‍य आहे. स्थानिक शेतकऱ्यांकडून तिथे कृषीपर्यटनाच्या अंगानेही सुविधा उभ्या करता येतील. मगरींबद्दल इत्थंभूत माहिती या मनोऱ्यांमध्ये लावता येईल. 
- हर्षद दिवेकर, वन्यप्राणी मित्र व अभ्यासक

मगरींच्या दर्शनासाठी पर्यटक बोटींची सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. औदुंबर येथील काही नावाडी मंडळी मगरी दाखवण्यासाठी सध्या पर्यटकांना नेतातही. मात्र सुरक्षित अशा बोटींची त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिल्यानंतर मगर दर्शनाकडे पर्यटकांचा ओढा वाढू शकतो. सांगलीतही हरिपूरमध्ये मगरींची संख्या मोठी आहे. सांगलीलगत अशी सोय आहे असे लक्षात आले तर हरिपूरला पर्यटकांचा ओढा वाढू शकतो. सध्या मगरी मोठ्या संख्येने चांदोली धरणाच्या जलाशयात सोडल्या जातात. जलाशयाचा एखाद्या टोकाच्या भागात बंदिस्तपणा करून मगरींचे पार्क तयार करता येणे शक्‍य आहे. आम्ही हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला आहे. तिथेही निरीक्षण मनोरा उभा करता येईल.
- समाधान चव्हाण, जिल्हा वन अधिकारी  

कृष्णा नदी केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यात पर्यटनासाठी केंद्रे विकसित करण्याचे काम सांगलीचे ब्रॅंडिंग म्हणून सुरूच आहे. क्रोकोडाईल पार्क ही संकल्पना नावीन्यपूर्ण योजनेसह अगदी खास बाब म्हणून वेगळ्या पद्धतीनेही करू शकतो. चांदोली तर यासाठी सक्षम पर्याय आहे. शहरालगतही विचार होऊ शकतो, पण यासाठी सर्व्हे केला पाहिजे.
- शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com