तुंगला कृष्णा नदीत मगरीचे दर्शन

तुंगला कृष्णा नदीत मगरीचे दर्शन

तुंग - येथील कृष्णा नदीमध्ये मगरीचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी नदीला पोहायला गेलेल्या युवकांना नदीतील मध्यभागी एका खडकावर भली मोठी मगर विसावलेली दिसली. 

अंदाजे दहा फुटांची मगर पाहून सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. काही खोडसाळ मुलांनी तिला दगड मारून हुसकावण्याचा प्रयत्न केला. गोंगाटामुळे मगर पाण्यात निघून गेली. दुपारी पुन्हा मगर नदीपात्राबाहेर येऊन विश्रांती घेत असलेली दिसून आली. काही युवकांनी तिचे फोटो काढून सोशल मीडियामध्ये टाकले होते.
भलीमोठी मगर पाहून नदीला जाणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नदीपात्राबाहेर आलेल्या मगरीचीही छेडण्याचा प्रयत्न केला. परंतु, मगरीने पाण्यात धूम ठोकली. दिवसभरात नदीपात्रात व बाहेर मगर आल्याचे गावात माहीत झाल्याने नदीवर येणाऱ्या ग्रामस्थांची व पोहायला येणाऱ्या युवकांची संख्या कमी झाली आहे. 

वन विभागाने याकडे लक्ष देऊन मनुष्य वर्दळीच्या भागात संरक्षक जाळी बसवावी अथवा लोकांच्या वर्दळीचा भाग सुरक्षित करावा, अशी मागणी होत आहे. 

आठवड्याभरापूर्वी कसबे डिग्रज येथे मगरीच्या पिलाची हत्या केली होती. तुंग ते कसबे डिग्रज या परिसरामध्ये मगरींची संख्या मोठी आहे. तसेच त्यांच्या अधिवासाची ठिकाणेही अधिक आहेत. दरम्यान, तीव्र उन्हाळा असल्याने नदीवर येणाऱ्या युवकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com