शिरोळ तालुक्यात शिरढोण येथे सातत्याने मगरीचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

जयसिंगपूर - शिरढोण (ता. शिरोळ) येथील कोईक मळ्यातील ओताच्या काठावर सातत्याने मगरीचे दर्शन होत आहे. मंगळवारी सुमारे सात फूट लांबीची मगर काठावर आढळल्याने मगर पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी झाली.

जयसिंगपूर - शिरढोण (ता. शिरोळ) येथील कोईक मळ्यातील ओताच्या काठावर सातत्याने मगरीचे दर्शन होत आहे. मंगळवारी सुमारे सात फूट लांबीची मगर काठावर आढळल्याने मगर पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी झाली.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी मगरीचा वावर असल्याने याबाबत वनविभागाच्याcroco अधिकाऱ्यांना कळवून देखील याकडे दुर्लक्ष झाले आहे. भविष्यात अनर्थ घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. 

शिरढोण येथील ओताच्या काठावर मगरीचा वावर असतो त्यामुळे शेतकरी शेतात काम करण्यास घाबरतात. जीव मुठीत धरुन काम करावे लागते. शिवाय, जवळ असणाऱ्या मळ्यात जनावरेदेखील ठेवली जात नाहीत. गेल्या दीड वर्षापासून मगरीचा वावर असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

ओताकाठी गवत आणि ऊसाची शेती आहे. मात्र, मगरीच्या भितीने शेतकरी शेतातील गवत कापण्यास जात नाहीत. तर ऊसाला रात्रीच्या वेळेस पाणी देण्यास शेतकरी शेतात जात नसल्याचे चित्र आहे. 

वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांशी उध्दट बोलले जात असल्याच्या तक्रारी नागरीकांकडून ऐकण्यास मिळाल्या. पिंजऱ्याच्या माध्यमातून मगरीला जेरबंद करणे सहज शक्‍य असूनदेखील ओताकाठी असणारी झाडेझुडपे काढून टाका, ओतातील पाणी उपसा करा अशा सूचना अधिकाऱ्यांकडून दिल्या जात आहेत. ज्यांच्याकडे मदतीची अपेक्षा धरायची त्यांच्याकडूनच केवळ सूचना दिल्या जात आहेत. उद्या एखादा अनर्थ घडल्यास याला जबाबदार कोणाला धरायचे असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मगरीच्या वावराने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने पावले उचलून मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी भयभीत झालेल्या शेतकऱ्यांमधून होत आहे. 

मगरीच्या वावरामुळे शेतात काम करणे धोक्‍याचे झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मगरीच्या भितीमुळे जनावरांना गवत कापणेही अवघड झाले आहे. मगरीच्या भितीखाली शेतकरी असतानाही वन विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

- बाळासो सांगले, शेतकरी, शिरढोण 

Web Title: crocodile seen in Shirdhon