अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 557 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे, पशुधनाचे, घरांचे व इतर नुकसानीचे पंचनामे करून अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. 33 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक बाधित असलेल्या क्षेत्राचा यामध्ये विचार करण्यात आला असून जिल्ह्यातील 688 शेतकऱ्यांचे 557 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या भरपाईसाठी 90 लाख 16 हजार रुपयांचा निधी आवश्‍यक असून या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील 331 हेक्‍टरवरील फळबागांचे नुकसान झाले असून त्यामध्ये 394 शेतकरी बाधित झाले आहेत. फळपिके वगळून इतर 225 हेक्‍टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीत 293 शेतकरी बाधित झाले आहेत. अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील लहान मोठ्या 28 जनावरांचा मृत्यू झाला आहे. अवकाळीमुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील पाच व्यक्तींचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील 218 घरांची पडझड झाल्याची माहितीही या अहवालात देण्यात आली आहे. 

निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली म्हणाले, जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. ही मदत लवकर मिळविण्यासाठी आवश्‍यक असलेला पाठपुरावा केला जाणार आहे. 

माढा तालुक्‍याला फटका 
जिल्ह्यातील 218 घरांच्या पडझडीत माढा तालुक्‍यातील दहा गावांमधील 142 घरांचा सर्वाधिक समावेश आहे. मंगळवेढ्यातील 37 घरे, सांगोल्यातील 39 घरांचा समावेश आहे. या अवकाळीचा फटका, माढा, मोहोळ, मंगळवेढा, बार्शी, करमाळा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्‍यांना कमी अधिक प्रमाणात बसला आहे. 

Web Title: Crop damage 557 hectares of solapur district