अत्यल्प पावसाने शेती नुकसानीला पिकविमाच आधार 

विष्णू मोहिते 
Wednesday, 7 October 2020

अत्यल्प पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी पिकविमाच शेतकऱ्यांच्या मदतीला येणार आहे. त्यासाठी संबंधित कंपनी, कृषी सहाय्यकांशी शेतकऱ्यांनी संपर्क साधणे गरजेचे आहे. 

सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली. बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाने खरीपातील पिकांसह उसाचेही नुकसान झाले. भूईमूग, उडीद, मक्का, बाजरी, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश नियमित आहेत. मात्र, अत्यल्प पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी पिकविमाच शेतकऱ्यांच्या मदतीला येणार आहे. त्यासाठी संबंधित कंपनी, कृषी सहाय्यकांशी शेतकऱ्यांनी संपर्क साधणे गरजेचे आहे. 

गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणीचे पंचनामे सुरु झाले आहेत. मात्र ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही मात्र पिकांचे नुकसान झाले आहे, अशा पिकांसाठी संबंधित शेतकऱ्यांनी उतरवलेला पिक विमाच मदतीला येणार आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे आग्रह धरावा लागणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने भूईमूग शेंगांना करे येत आहेत, उडीद फुटत आहे, बाजरी, मक्‍याचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस भूईसपाट झाल्याचे चित्र अनेक भागात आहे. पावसाने डाळिंब, द्राक्ष व पालेभाज्यांचेही नुकसान झाले आणि होत आहे. शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून ताबडतोब भरपाईची मागणी आहे. 

अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी आदेश नियमित आहेत. अन्य पिकांच्या नुकसानीसाठी पिकविम्याचा शेतकऱ्यांनी आधार घेतला पाहिजे. कंपन्यांशी संपर्क साधून कृषी सहाय्यकांच्या मदतीने तातडीने पंचनामे करुन घ्यावेत. 
- बसवराज मास्तोळी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सांगली.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crop insurance is the mainstay of agricultural losses