कडेगाव तालुक्‍यात पिकांचे पंचनामे अंतिम टप्प्यात

संतोष कणसे 
Friday, 23 October 2020

कडेगाव : तालुक्‍यात झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीपिकांचे कृषी व महसूल विभागामार्फत पंचनामे सुरु झाले आहेत. आतापर्यंत 70 टक्के पंचनाम्याचे काम पुर्ण झाले आहे.

कडेगाव : तालुक्‍यात झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीपिकांचे कृषी व महसूल विभागामार्फत पंचनामे सुरु झाले आहेत. आतापर्यंत 70 टक्के पंचनाम्याचे काम पुर्ण झाले आहे. तर येत्या दोन दिवसांत शंभर टक्के पंचनामे पुर्ण होतील अशी अपेक्षा आहे. 

तालुक्‍याला गेल्या पंधरा दिवसांत मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे तालुक्‍यातील आले, केळी, भाजीपाला, सोयाबीन, कलिंगड, हळद, द्राक्षे आदी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी दिवसरात्र काबाडकष्ट करुन व बॅंका, सोसायटीची कर्जे काढून आपल्या शेतातील पिके जोमात आणली. परंतु अवकाळी पावसाने हातातोंडाला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यावर आता कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. 

शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महसुल व कृषी विभागाला शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे सध्या तालुक्‍यात कृषी व महसुल विभागाच्या वतीने 32 शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी सहायक व गावकामगार तलाठी आदींच्याकडून सुरु आहे. तर तालुक्‍यातील नुकसान झालेल्या शेती पिकांची लोकप्रतिनिधीसहित प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, तालुका कृषी अधिकारी बी. जी. कदम आदींनी पाहणी केली आहे. 

तालुक्‍यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते दोन दिवसात पुर्ण होईल. त्यानंतर तत्काळ याबाबतचा अहवाल शासनाला सादर केला जाईल. 
- बी. जी. कदम, तालुका कृषी अधिकारी, कडेगाव

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crop panchnama in Kadegaon taluka in final stage