पिके पाण्यात; नेते सत्तास्थापनेत मश्‍गूल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

राज्याचे नेते सत्तास्थापनेत मश्‍गूल आहेत. अधिकारी नियमांवर बोट ठेवत आहेत. या सगळ्या धबडग्यात शेतकरी भरडला जात आहे. 

कर्जत (नगर ) : "निवडणुकीत रात कळत नव्हती की दिस. सारख्या भेटीगाठी, नुस्ता आश्वासनांचा भडिमार होता. रानात गुडघाभर पाणी साचलंय. सगळं पीक पाण्यात आहे. आता ढुंकूनही कोणी पाहीना राव,' अशा प्रकारची अगतिकता एकमेकांसमोर मांडली जात आहे. राज्याचे नेते सत्तास्थापनेत मश्‍गूल आहेत. अधिकारी नियमांवर बोट ठेवत आहेत. या सगळ्या धबडग्यात शेतकरी भरडला जात आहे. 

बहुतांश नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते गायब झालेत. सध्या तुळशीच्या लग्नानंतर साखरपुडा अथवा लग्नसमारंभ सुरू झालेत; परंतु त्यातही ती गर्दी दिसत नाही. 

सध्या तालुक्‍यातील ग्रामीण भागात विदारक चित्र आहे. परतीच्या पावसाने कधी नव्हे ती जोरदार हजेरी लावली. तारणहार ठरणाऱ्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. सरासरीपेक्षा जास्त पावसाने मर्यादा ओलांडली. खरिपाच्या पिकाची त्याने नासाडी केली. सध्या यंत्रणेकडून पंचनामे सुरू आहेत. त्यातून काय हाती पडेल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

सरसकट नुकसान भरपाई द्यावी 

शेतात साचलेले पाणी, कुजलेला कांदा, बाजरीची कणसे, भुईसपाट झालेली ज्वारी व इतर पिके डोळ्यासमोर दिसत असताना निकष आणि अटी कशाकरिता? हा सर्व वेळकाढूपणा असून, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी. पंचनामा, अहवाल या गोष्टी टाळाव्यात, अन्यथा पुन्हा शेतकऱ्यांना संपाचे हत्यार उपसावे लागेल. मात्र, या वेळी तीव्रता खूप मोठी असेल. 
 

- पोपट खोसे, सामाजिक कार्यकर्ते, मलठण 

 

नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले 

तालुक्‍यातील बाधित सुमारे पंचवीस हजार हेक्‍टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. येत्या एक-दोन दिवसांत त्याचा अंतिम अहवाल जाईल. प्रथम तालुका, नंतर जिल्हा आणि नंतर राज्यस्तरीय पंचनाम्यांचे संकलन होऊन नुकसान भरपाईबाबत योग्य ती उचित कार्यवाही होईल 

- छगनराव वाघ, तहसीलदार, कर्जत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crops in water; Leaders cheer in power

टॅग्स