प्रवाशांच्या महापुरात बुडाली बसस्थानके

दौलत झावरे
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर एसटीने जादा बस सोडल्या होत्या, तरीही त्या अपुऱ्या पडत आहेत. प्रवाशांची संख्या वाढते आहे; मात्र गेल्या पाच वर्षांत एकही बस नगर विभागाला मिळालेली नाही. तरीही विभागनियंत्रक विजय गिते, विभागीय वाहतूक अधीक्षक दादासाहेब महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी योग्य नियोजन करीत आहेत.

नगर : जिल्ह्यातील सर्वच बसस्थानके प्रवाशांच्या महापुरात बुडाली आहेत. दिवाळीची सुटी संपत आल्यामुळे प्रवाशांचे लोंढे स्थानकांवर अहोरात्र आदळत आहेत. भाऊबीजेनंतर बसस्थानकांमध्ये गर्दीचा उच्चांक होत आहे. एसटीचे अधिकारी व कर्मचारी प्रवाशांच्या सोयीसाठी दिवस-रात्र नियोजन करीत आहेत.

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर एसटीने जादा बस सोडल्या होत्या, तरीही त्या अपुऱ्या पडत आहेत. प्रवाशांची संख्या वाढते आहे; मात्र गेल्या पाच वर्षांत एकही बस नगर विभागाला मिळालेली नाही. तरीही विभागनियंत्रक विजय गिते, विभागीय वाहतूक अधीक्षक दादासाहेब महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी योग्य नियोजन करीत आहेत.

नाशिक, पुणे, मुंबई, कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे एसटी प्रशासनाने 80च्या वर जादा बस सोडल्या आहेत. आज दिवसभरात सुमारे 100 बस जादा सोडल्या. जिल्ह्यातील अकरा आगारांतून पुण्याला सुमारे 110 बस जातात. त्याव्यतिरिक्तही जादा बस सोडल्या आहेत.

वाहक-चालक उठले झोपेतून
तारकपूर येथे कल्याण आगाराची बस रात्रीच्या वेळी मुक्कामाला आली होती. गर्दी वाढल्याने आगारातील अधिकाऱ्यांनी संबंधित चालक व वाहकांना, "तुम्हाला लगेच कल्याणला जावे लागेल,' असे सांगितले. "आमची झोप झालेली नाही. घाटाचा रस्ता आहे; पण प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही जायला तयार आहोत. आम्ही बस आळे फाट्यापर्यंतच नेऊ शकतो,' असे त्यांनी सांगितले. त्यावर प्रवाशांनी, "आम्हाला उशीर झाला तरी चालेल; पण चालकाची झोप होऊ द्या,' असे सांगितल्यावर ती बस रद्द करण्यात आली.

खराब रस्त्यांमुळे कोलमडले नियोजन
खराब रस्त्यामुळे शनिवारी रात्री बीड, भूम, उस्मानाबाद येथून साडेनऊ, साडेदहा व साडेअकरा वाजता येणाऱ्या तीन बस तारकपूर आगारात उशिरा आल्या. त्यामुळे कल्याणला जाणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन तारकपूर आगारातून सहायक वाहतूक निरीक्षक अविनाश गायकवाड यांनी तातडीने एक बस सोडल्याने प्रवाशांची गैरसोय टळली.

रेल्वे बंद असल्यामुळे एसटीला गर्दी
कल्याण-पुणे रेल्वेमार्गाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे कल्याण आगारातून पुण्यासाठी या वर्षी जादा बस सोडाव्या लागल्या. परिणामी, नगरला जादा बस न मिळाल्याने नगरहून कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

रांगांमुळे टळली चेंगराचेंगरी
स्थानकांवर प्रवाशांचा महापूर आहे. बस आल्यानंतर प्रवाशांची झुंबड उडते. या धावपळीत लहान मुले, वृद्धांचे हाल होतात. विभागीय वाहतूक अधीक्षक दादासाहेब महाजन, चंद्रकांत खेमनर आदींसह कर्मचाऱ्यांनी स्वस्तिक चौक बस स्थानकामध्ये प्रवाशांना रांगा लावण्यास भाग पाडले. त्यामुळे संभाव्य चेंगराचेंगरी टळली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The crowd at the bus stop