कशी आहे ज्येष्ठांची सांस्कृतिक पहाट एकदा बघाच! (व्हिडिओ)

सुस्मिता वडतिले
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

- 40 वर्षांपासून सकाळी दोन तास योगासने, प्राणायाम, मॉर्निंग वॉक 
- संगीताच्या मैफलीचा रंग चढावा तसा रोजच रंग 
- भजन, अभंगानंतर टाळ्यांची दाद 

सोलापूर : अथांग आभाळाखाली हिरवळीच्या मोकळ्या जागेत सकाळचे दोन तास आनंदाने घालवणे. सकाळच्या गुलाबी थंडीच्या वातावरणात सर्वांनी एकमेकांना दिलेली साद... तर भजन-अभंगानंतर टाळ्यांनी दिलेली दाद... हरिनामाच्या गजरात तल्लीन झालेले ज्येष्ठ मंडळी... असेच काहीसे चित्र किल्ला खंदक बागेत सकाळी पाहावयास मिळत आहे. सकाळी रंगलेल्या या मैफलीमध्ये उपस्थित मनमुराद आनंद लुटतात. एखाद्या संगीताच्या मैफलीचा रंग चढावा तसा रंग रोज या ज्येष्ठ मंडळींना चढतो. 

हेही वाचा : इंदिरा गांधींनी महाराष्ट्रातील "या' शहरात केली कोकण रेल्वेसह चार मार्गाची घोषणा 
40 वर्षापासून.... 
हरळी प्लॉट योगासन मंडळ (आनंदयात्री) ही ज्येष्ठांची संघटना आहे. 40 वर्षांपासून अखंडपणे सकाळी दोन तास योगासन, प्राणायाम, मॉर्निंग वॉक, प्रार्थना, भक्तिगीत, सीनेगीत, अभंग, सद्विचारांचे मंथन, धार्मिक बोधकथा, हास्यविनोद व ज्ञानीजनांचे प्रबोधन, तज्ज्ञ डॉक्‍टरांचे मार्गदर्शन म्हणजे सकाळी भरली जाणारी आनंदयात्रींची मैफल. हे मंडळ सोलापुरात ठसा उमटविणारे मंडळ म्हणून समजले जाते. या मंडळाचे 140 सभासद आहेत. हे सर्व सभासद प्रतिदिन भेटत असून उत्साहाने व आनंदाने दररोज आपले सुखदुःख विसरून जातात. "सर्वज्ञ सुखींना संतु' हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत आहेत. शारीरिक व मानसिक आरोग्य, समता, बंधुत्व, ज्ञान, मनोरंजन, जीवनदायी उत्स्फूर्त विचार यांचा संगम येथे दिसून येतो. 

हेही वाचा : सुशिलकुमार शिंदेंनाही "का' वाटली काळजी 
यामुळे सदस्य नेहमी प्रसन्नचित्त 
या मंडळात सदस्यांचे वाढदिवस, भारतासह जगात भ्रमंती, विविध सहलींचे आयोजन, वार्षिक सहकुटुंब स्नेहसंमेलन, 15 ऑगस्ट व 26 जानेवारी राष्ट्रीय सण, दसरा, मकरसंक्रांत, कोजागरी पौर्णिमा असे धार्मिक सणही उत्साहाने साजरे केले जातात. हे मंडळ नवनवीन विचारांचा शोध घेण्यास नेहमी तत्पर असतो. सुभाषित व सुविचारांचा येथे पडतो भरपूर पाऊस... पोटभर हसविणारे विनोद... चिंता व तणावमुक्त करण्याची विद्या,.. स्वास्थ्य व सुखी जीवनाचा मंत्र... यामुळे सदस्य नेहमी प्रसन्नचित्त असतो. 

हे मंडळ अनेक वर्षापासून सुरू आहे. या मंडळात अनेकांची तिसरी पिढीही येत आहे. वर्षभरात आमचे अनेक कार्यक्रम साजरे करतो. सामाजिक कार्यामध्ये मतदानाची जनजागृती देखील केली. 
- विजयकुमार मेणसे, मंडळाचे अध्यक्ष 

या मंडळात 23 व्यायाम घेतो. तसेच प्रत्येकाचे वाढदिवस साजरे करतो. बरेच साहित्यिक, डॉक्‍टर, वैद्यकीय तज्ज्ञांना बोलावतो. रोज येथे 92 वर्षापर्यंतचे ज्येष्ठ मंडळी येत असतात. 
- गणपतसा मिरजकर 

आमच्या मंडळाची उभारणी सहा तत्त्वावर आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य, ज्ञान आणि मनोरंजन, बंधुत्व आणि समता यावर उभी आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तज्ज्ञ डॉक्‍टरांचे मार्गदर्शन घेतो. आम्हा सभासंदाना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. 
- श्रीवल्लभ करमरकर 

माझ्यापेक्षा येथे अनेक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ मंडळी आहेत. परंतु सर्वजण कुणालाही लहान मोठे मानत नाही. भारताबाहेरही आम्ही जगाची भ्रमंती केली आहे. या सर्वांचे बौद्धिक विचार घेऊन चालणारे मंडळ आहे. 
- मोहन तुम्मा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cultural dawn of senior citizens