भन्नाट चार्ली अन्‌ दिलखेचक अश्‍वत्थामा

cultural festival in kolhapur
cultural festival in kolhapur

कोल्हापूर - चार्ली चॅप्लिनचा भन्नाट अभिनय, अश्‍वत्थामाचे दिलखेचक संवाद, कामवाल्या बायकांचे दु:ख, पाणी बचतीचा संदेश अन्‌ चित्र-विचित्र एकांकिकांतून केलेल्या समाज प्रबोधनाने शिवोत्सवाचा दुसरा दिवस संस्मरणीय ठरला. वेस्टर्न सोलो व वेस्टर्न समूह गायनातून पाश्‍चात्त्य सुरावटींच्या आनंदात लोककला केंद्रही मंत्रमुग्ध झाले. शिवाजी विद्यापीठातर्फे महोत्सवाचे आयोजन केले आहे.

चंदीगड विद्यापीठाने "किंग ऑफ ट्रॅजेडी' विषयावर सादर केलेली उपस्थितांच्या काळजाला भिडली. विनोदाचा बादशहा चार्लीच्या जीवनावर आधारीत एकांकिकेने तरुणाईच्या हृदयावर अधिराज्य गाजविले. अक्षय रावत याने चार्लीचा केलेला अभिनय टाळ्यांची दाद घेऊन गेला. शिवम शर्मा, रूबी चौहान, समीर टाक, प्रयास दुबे, मनीला, अंकित परिख, मानसी व सनी यांच्याही एकांकिकेत भूमिका होत्या. जबलपूरच्या राणी दुर्गावती विद्यापीठाने "पशू का अंत'

एकांकिकेतून अश्‍वत्थामाच्या जीवनावर प्रकाश टाकला. स्वरूप चौधरीने अश्‍वत्थामाची केलेली भूमिका अफलातून ठरली. त्याच्या अभिनयाने उपस्थितांची दाद घेतली.
मुंबई विद्यापीठने "झुला धीर से झुला' विषयातून नसबंदी विषय हाताळला. शंतनू रांगणेकर, तन्मय चव्हाण, वैष्णवी फाटक, अक्षय राणे, रोहन कोतेकर, ऋषीकेश देशमाने, मृणाली सावंत यांनी उत्तम अभिनयाने एकांकिका सजवली. रणवीरसिंग चौधरी विद्यापीठ नीर निरूपण एकांकिकेतून पाणी बचतीचे महत्त्व स्पष्ट केले. एसएनडीटी विद्यापीठाने कामवाल्या बायकांचे दु:ख मांडून स्त्रीचा जन्म केवळ दु:ख भोगण्यासाठी झाला नसल्याचा संदेश दिला. त्यांच्या एकांकिकेला टाळ्यांचा कडकडाट मिळाला.

सोलापूर विद्यापीठाने "मजार' एकांकिकेतून पाकिस्तानातून आलेल्या हिंदू महिलेला मुस्लिम भारतीय सैनिकाने दिलेल्या सन्मानजनक वागणुकीची मांडणी केली.
वेस्टर्न सोलो प्रकारात चौदा विद्यापीठे सहभागी झाली होती. लोककला केंद्रात सकाळच्या सत्रात वेस्टर्न सोलो प्रकाराने उपस्थितांना थक्क केले. पाश्‍चात्त्य संगीताच्या ठेक्‍यावर गायकांचे सूर अनेकांच्या कानात घुमत राहिले. छत्रपती शाहू महाराज (कानपूर), सावित्रीबाई फुले (पुणे), विद्यासागर (मिदनापूर, पश्‍चिम बंगाल), कालिकत (केरळ), बंगळूर (कर्नाटक), बनारस हिंदू (उत्तर प्रदेश), सरदार पटेल (गुजरात), राणी दुर्गावती (जबलपूर), मुंबई (महाराष्ट्र), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (नागपूर), संत गाडगे बाबा (अमरावती), महात्मा गांधी (अलिगड), गुरू नानक (अमृतसर) विद्यापीठाने सोलो प्रकारात सहभागी झाली.

दृष्टिक्षेप
* चंदीगड विद्यापीठाने किंग ऑफ ट्रॅजेडी विषयावरील एकांकिकेची विद्यापीठ वर्तुळात जाहिरात केली होती. सर्व कॅंटीनच्या परिसरात त्याचे पत्रक चिकटविले होते. विशेष म्हणजे एकांकिकेसाठी
त्यांनी एक ट्रक साहित्य आणले होते. त्यात चार्लीच्या पुतळ्यांसह विविध लाकडी आकृत्यांचा समावेश होता. त्यांच्या एकांकिकेला टाळ्यांचा जोरदार प्रतिसाद तर मिळालाच, शिवाय त्यांनी वापरलेल्या साहित्याची चर्चा चांगलीच रंगली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com