सांगली जिल्ह्यात चलनकल्लोळ कायम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

रिझर्व्ह बॅंकेकडून नोटा छपाई मागणीच्या प्रमाणात होत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहे. पाचशे-हजारच्या नोटा अद्यापही सांगलीत आलेल्या नाहीत. जिल्ह्याची मागणी ३०० कोटी आहे. मात्र केवळ १० कोटीच मिळाले आहेत. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. अजूनही वर्षभर हीच स्थिती राहण्याची शक्‍यता आहे.
- रवींद्र पुजारी, प्रबंधक, जिल्हा अग्रणी बॅंक 

सांगली - रोकडसाठी नागरिकांची धावाधाव सुरूच आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात चलन पुरवठा होत नाही. दोनशे कोटींची मागणी आहे, मात्र प्रत्यक्षात बॅंकेकडून १० कोटीच रुपये जिल्ह्याच्या वाटेला आलेत. अजूनही काही महिने अशीच स्थिती राहील, असे बॅंक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

नोटाबंदीच्या निर्णयाला महिना उलटला. तरीही रोकडसाठी धावाधाव काही कमी होत नाही. मिळेल त्या पैशांवरच चालवा, ‘कॅशलेस’कडे वळा, असे उपदेश ऐकूनच ग्राहकांना दिवस ढकलावे लागत आहेत. आज नाही तर उद्या पैसे मिळतील, म्हणून बॅंक आणि एटीएमसमोर लांबलचक रांगा आजही कायम होत्या. जिल्ह्यात आतापर्यंत वाटप झालेल्या रकमेतूनच देवघेव सुरू आहे. जिल्ह्यातील स्टेट बॅंकेचे एटीएम वगळता अन्यत्र ‘नो कॅश’ चे फलक आहेत. शंभरऐवजी दोन हजारच्याच नोटा घ्याव्या लागत आहे. मिळालेल्या नोटांचा वापर करताना सुट्ट्यांचा प्रश्‍न कायम आहे. त्यामुळे चलनकल्लोळ सुरू आहे. 

शहरात रात्री उशिरापर्यंत रांगेत राहून मिळेल त्या नोटेवर समाधान मानवे लागत आहे. बॅंकांतही दररोज नवे फलक लागत आहे. आज हजारच मिळतील, असे फलक आजच काही बॅंकांत होते. सरकारने निर्णय चांगला आहे, पण त्याची अंमलबजावणी गतीने झाली पाहिजे. पण महिना उलटला तरी बॅंकेच्या रांगेत उभे राहावे लागत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. 

पगारदारांची गोची 
या आठवड्यात कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचे पगार होतात. मात्र पगार काढण्यासाठी रजा काढून रांगेत उभारावे लागत आहे. पुरेशा प्रमाणात पैसेही मिळत नाही, त्यामुळे मोठी गोची निर्माण झाली आहे. महिन्याचे बजेट कोलमडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: currency ban issue in sangli district