सांगलीत पुन्हा 19 लाख जप्त

सांगलीत पुन्हा 19 लाख जप्त

सांगली - पाचशे व हजाराच्या नोटा बदली करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या हाफीजहू उर्फ मुन्ना रेहमान मेहबूब शेख (वय 32, दडगे प्लॉट, लक्ष्मीनगर, साखर कारखानासमोर) याला सांगली शहर पोलिसांनी कर्नाळ रस्त्यावर शिवशंभो चौकात काल (ता. 18) रात्री पकडले. त्याच्याकडून तब्बल 19 लाख 30 हजार 100 रुपये ताब्यात घेतले. पोलिसांनी याबाबत आयकर विभागाला कळवले आहे.

संजयनगर पोलिस ठाणे हद्दीत तीन दिवसांपूर्वी माधवनगर-कर्नाळ रस्त्यावर उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या पथकाने 19 लाख रुपये ताब्यात घेतले होते. पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे तसेच निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची गस्त काटेकोरपणे सुरू आहे. काल शहर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक युवराज कामटे यांना मुन्ना शेख हा नोटा बदलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. निरीक्षक अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौकात सापळा रचला. रात्री साडेआठ वाजता दुचाकी (एमएच 10 एझेड 373) वरून जाणाऱ्या मुन्नाला अडवून सॅक तपासली. त्यामध्ये तब्बल 19 लाख 30 हजार रुपये मिळाले.

मुन्नाला ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणले. त्याची चौकशी केल्यानंतर नोटा बदली करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत मुन्नाची व साथीदाराची चौकशी केली. चौकशीत त्याने अन्य एकाकडून नोटा खपवण्यासाठी घेतल्याचे कबूल केले. रात्री 12 पर्यंत कसून चौकशी केल्यानंतर स्टेशन डायरीत नोंद करून मुन्ना आणि साथीदाराला सोडून दिले. सदरच्या रकमेबाबत आयकर विभागाला कळवले आहे. त्यामुळे आयकर विभाग आणि पोलिस यांच्या चौकशीनंतर रकमेबाबत गुन्हा दाखल केला जाणार आहे.

दरम्यान, मुन्ना आणि त्याच्या साथीदाराची एलसीबीचे पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील, सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या पथकाने आज सकाळी चौकशी केली.

नगरसेवक, जि. प. सदस्य धावले..
मुन्ना शेखला ताब्यात घेऊन रक्कम जप्त केल्याची माहिती मिळाल्यानंतर सांगलीतील एक नगरसेवक आणि जिल्हा परिषदेचे सदस्य पोलिस ठाणे आवारात आले होते. त्यांच्याबरोबर कार्यकर्ते देखील होते. थोडा वेळ थांबून चौकशी करून दोघेजण माघारी फिरले. दोघांच्या उपस्थितीची चर्चा सुरू आहे.

माधवनगरच्या एकाची रक्कम
गुजरातमधील एका इलेक्‍ट्रिक स्वीच बनवणाऱ्या कंपनीची एजन्सी माधवनगरातील एका तरुणाकडे आहे. दिवाळीत त्याच्याकडे मोठी रक्कम प्राप्त झाली होती. पाचशे व हजाराच्या नोटांवर बंदी आल्यामुळे त्याच्यापुढे 20 लाख रुपयांचे करायचे काय? असा प्रश्‍न निर्माण झाला. त्याने शरद नामक एकाकडे नोटा बदली करण्यासाठी दिल्या. शरदने पुढे मुन्नाकडे नोटा दिल्या. त्यानंतर मुन्नाची रक्कम पोलिसांना सापडली असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

सांगलीत दुसरी कारवाई
माधवनगरजवळ तीन दिवसांपूर्वी 19 लाख रुपये पोलिसांनी जप्त केले. त्यानंतर शहर पोलिसांनी माधवनगरच्याच एकाचे 19 लाख 30 हजार रुपये सांगलीत पकडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com