नोटा अजून दूरच..!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

तुटवडा शिगेला; बाजारपेठेतील चलन पुन्हा बॅंकेत जाईना
सातारा - नोटाबंदीच्या निर्णयाला तब्बल महिना उलटूनही नोटांचा तुटवडा प्रचंड प्रमाणात भासू लागला आहे. आज दिवसभरात एसबीआयसह विविध बॅंकांची बहुतांश एटीएम बंदच होती. नोटा मिळत असलेल्या एटीएम सेंटरवर लांब रांगा कायम होत्या. बाजारपेठेत चलन असले तरी ते बॅंकेत भरले जात नसल्याने नोटा उपलब्ध करण्याचा बॅंकेपुढील मार्गही खुंटला आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या आडमुठ्या धोरणांमुळे इतर बॅंकांना चलन मिळत नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

भ्रष्टाचार, काळा पैसा, दहशतवाद यावर हल्ला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पाचशे, हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा नव्याने छापण्यात आल्या.

त्यातील दोन हजाराच्या नोटा बाजारपेठेत उपलब्ध असल्या तरी पाचशे रुपयांच्या नोटा अद्यापही पुरेशा प्रमाणात नागरिकांच्या हाती आल्या नाहीत. या निर्णयाला एक महिना होऊन गेला, तरी नोटाबंदीच्या अनुषंगाने पुरेशा उपाययोजना सरकार, रिझर्व्ह बॅंकेकडून केल्या जात नसल्याची टीकाही होत आहे.

शनिवार ते सोमवारपर्यंत बॅंकांना सुट्या झाल्यानंतर काल बॅंका सुरू झाल्या. त्यामुळे एटीएम, बॅंकांमध्ये पैसे काढण्यासाठी रांगाच रांगा लागल्या होत्या. परिमाणी, काल सायंकाळीच अनेक एमटीएममधील पैसेही संपले. स्टेट बॅंकेकडून पुरेशा प्रमाणात इतर बॅंकांना रक्‍कम उपलब्ध होत नसल्याने महाराष्ट्र बॅंकेसह इतर राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये चलनाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे. स्टेट बॅंकेकडून केवळ आपल्या शाखांना पैसे दिले जात असल्याची टीकाही बॅंकिंग क्षेत्रातून होत आहे. आजही बॅंका, एटीएम बाहेर दिवसभर रांगा लागलेल्या होत्या. साताऱ्यातील स्टेट बॅंकेचे काही एमटीएमही दिवसभर बंद होते.

बाजारपेठेतील व्यापारी, व्यावसायिकांकडे शंभर रुपयांच्या नोटा, चलन उपलब्ध असले तरी त्यांच्याकडून ते पुन्हा बॅंकेत भरले जात नाही. त्यामुळे बाजारपेठेतील खेळते चलन बॅंकांत जमा होत नाही. परिणामी, ग्राहकांना सुटे पैसे देण्यासाठी बॅंकांना चलन उपलब्ध होत नाही. त्याचा परिणाम नागरिकांवर होत आहे.

"अर्थ'लाइन ऑफच
ऑनलाइन, कॅशलेस व्यवहार करावेत, यासाठी शासन स्तरावर आवाहन केले जात आहे. बॅंकांकडूनही तोच पर्याय पुढे केला जात आहे. मात्र, बाजारपेठेत साहित्य, वस्तू खरेदीस गेल्यानंतर ऑनलाइन बॅंकिंग, बॅंकिंग ऍप, स्वाइप मशिनचे पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे खिशात एटीएम, मोबाइलमध्ये नेट बॅकिंगचे ऍप्स असूनही ते कुचकामी ठरत आहेत.

सातारा - पोवई नाका येथील बंद असलेले स्टेट बॅंकेचे एटीएम. (प्रमोद इंगळे - सकाळ छायाचित्रसेवा)

Web Title: currency shortage in satara