पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट! 

परशुराम कोकणे
शुक्रवार, 13 जुलै 2018

सोलापूर : पेट्रोल पंपावर होणारी ग्राहकांची लूट हा नेहमीचाच विषय आहे. ग्राहकांच्या नकळत दुचाकीच्या टाकीत कमी पेट्रोल सोडले जाते. तक्रार केली तरी कोणीच दाद देत नाही. असाच प्रकार गुरुवारी सकाळी होटगी रोड परिसरातील पेट्रोल पंपावर उघडकीस आला. तक्रार करण्यासाठी पोलिस चौकीत गेलेल्या ग्राहकाला तडजोड करण्याचा प्रयत्न झाला. 

सोलापूर : पेट्रोल पंपावर होणारी ग्राहकांची लूट हा नेहमीचाच विषय आहे. ग्राहकांच्या नकळत दुचाकीच्या टाकीत कमी पेट्रोल सोडले जाते. तक्रार केली तरी कोणीच दाद देत नाही. असाच प्रकार गुरुवारी सकाळी होटगी रोड परिसरातील पेट्रोल पंपावर उघडकीस आला. तक्रार करण्यासाठी पोलिस चौकीत गेलेल्या ग्राहकाला तडजोड करण्याचा प्रयत्न झाला. 

शुभम दीपक बगाडे हा तरुण दुचाकीतील पेट्रोल संपल्याने आसरा चौक परिसरातील पेट्रोल पंपावर गेला. टाकीत पेट्रोल नसल्याने तो दुचाकी ढकलतच पंपावर पोचला होता. त्याने 505 रुपयांचे पेट्रोल सोडण्यास सांगितले. 5.95 लिटर इतके पेट्रोल सोडणे अपेक्षित आहे. शुभमला संशय आल्याने त्याने पेट्रोल सोडणाऱ्या कर्मचाऱ्याकडे तक्रार केली. पेट्रोल कमी येऊ शकत नाही, तुम्हीच तपासून घ्या असे म्हणून टाळाटाळ करण्यात आली. शुभमने मित्र प्रसन्नजीत भोसले व इतरांना बोलावून पंपावरच बाटलीमध्ये दुचाकीच्या टाकीतील पेट्रोल काढले. 1.5 लिटर पेट्रोल कमी असल्याचे दिसून आले. पंप व्यवस्थापनाने शुभमच्या तक्रारीकडे अपेक्षित लक्ष दिले नाही. त्यानंतर तो मित्रांसोबत औद्योगिक पोलिस चौकीत आला. पोलिस उपनिरीक्षक देविदास कारंडे यांनी शुभमची तक्रार ऐकून घेतली. संबंधित विभागाकडे तक्रार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिस चौकीच्या परिसरातच तक्रार करणाऱ्या ग्राहकाशी तडजोड करण्याचा प्रयत्न झाला. यावरून पेट्रोल पंपावरील कारभाराविषयी संशय व्यक्त होत आहे. 

आसरा चौक परिसरातील पेट्रोल पंपावर ग्राहकाला कमी पेट्रोल आल्याची तक्रार आली आहे. ग्राहकाकडून तक्रार लिहून घेतली असून पुढील कारवाईसाठी संबंधित विभागाकडे पाठविले आहे. संशय आल्यास ग्राहकांनी तक्रार करायला हवी. 
- देविदास कारंडे, पोलिस उपनिरीक्षक 

पंप चालकांकडून फसवणूक होणे शक्‍य नाही. कर्मचारी हातचलाखी करून ग्राहकांची फसवणूक करू शकतात. ग्राहकांनी पंपावर गेल्यावर दक्ष राहून आकडे पाहावेत. संशय आल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. 
- सिद्धेश्‍वर वाले, सदस्य, पेट्रोल पंप असोसिएशन 

पेट्रोल भरण्यासाठी आलेले ग्राहक शुभम बगाडे यांनी कमी पेट्रोल आल्याची तक्रार केली आहे. ग्राहकाची फसवणूक होणे शक्‍य नाही. या संदर्भात चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. 
- प्रभूलिंग रामपुरे, पेट्रोल पंप व्यवस्थापक 

माझा मित्र शुभम याने 505 रुपयांचे पेट्रोल भरले. पेट्रोल कमी आल्याने संशय आला. आम्ही पेट्रोल काढून तपासले. बाटल्यांत फक्‍त चार लिटर पेट्रोल निघाले. तक्रार केल्यानंतर पंपचालकाने उडवाउडवी केली. 
- प्रसन्नजित भोसले, तक्रारदार

Web Title: customers looted by petrol pump