पंढरपूर-विजापूर महामार्गावर वृक्षांची खुलेआम कत्तल

श्रीकांत मेलगे 
शुक्रवार, 23 मार्च 2018

मरवडे (सोलापूर) : पर्यावरणाचा ढासळता समतोल साधण्यासाठी शासनाकडून वृक्षसंवर्धनासारखे अनेक उपक्रम राबविले जात असताना पंढरपूर-विजापूर महामार्गावर मरवडे-मंगळवेढा नजीक मात्र विकासकामाच्या नावावर शेकडो वृक्षांची खुलेआम कत्तल केली जात आहे.

मरवडे (सोलापूर) : पर्यावरणाचा ढासळता समतोल साधण्यासाठी शासनाकडून वृक्षसंवर्धनासारखे अनेक उपक्रम राबविले जात असताना पंढरपूर-विजापूर महामार्गावर मरवडे-मंगळवेढा नजीक मात्र विकासकामाच्या नावावर शेकडो वृक्षांची खुलेआम कत्तल केली जात आहे.

शंभर वर्षांहून अधिक काळ सोबत असणारे वृक्ष तोडले जात असल्यामुळे या वृक्षांविना रस्त्यावर मात्र पोरके होण्याची वेळ आली आहे. केंद्र शासनाकडून शतकोटी वृक्षलागवड तर राज्य सरकारकडून चार कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करीत या योजनावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. वृक्षलागवडीतून पर्यावरणाचा समतोल साधत असताना आर्थिक विकासाला गती मिळण्यासाठी अनेक रस्ते चौपदरीकरणाची कामेही शासनाच्या वतीने हाती घेण्यात आली आहेत.

गेल्या दीड वर्षापासून पंढरपूर-विजापूर या महामार्गाचेही चौपदरीकरण करण्यात येत आहे. सध्या मरवडे-मंगळवेढा मार्गावर रस्ता बनविण्याचे काम सुरू आहे. हा रस्ता बनवीत असताना शेकडो वृक्ष यांत्रिक कटरच्या साहयाने भुईसपाट करून लाकडी ओंडके ट्रॅक्टर व मजुरांच्या मदतीने इतरत्र रवाना केले जात आहेत. विकासाचे गाजर दाखवीत पर्यावरणावर घाला घातला जात असल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मरवडे-मंगळवेढा या रस्त्यावर दुतर्फा झाडे असल्यामुळे एक वेगळे सौंदर्य  या रस्त्याला प्राप्त झाले होते. या वृक्षांमुळे उन्हाळ्यातही एक  प्रकारचा गारवा परिसरात निर्माण होऊन येथील हिरवाई येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरुंना साद घालत असे. या झाडांच्या परिसरात प्राणवायू मोठया प्रमाणात उपलब्ध होत असल्याने अनेक वाटसरू या झाडाखाली क्षणभर विश्रांती घेऊनच पुढे मार्गक्रमण करीत होता. आता या मार्गावरील झाडेच तोडली जात असल्यामुळे विकासाच्या नावावर रस्त्याला भकास स्वरूप प्राप्त झाले आहे.

१९७५ च्या वृक्षसंवर्धन कायद्यानुसार रस्ते, बांधकाम, पाणीपुरवठा व सांडपाणी वाहिन्या, पदपथ या कामासाठी व धोकादायक वृक्ष तोडता येतात. या कायद्यानुसार रस्ते करीत असताना वृक्षतोड केल्यानंतर वृक्षांचे त्याच परिसरात पूनर्रोपण करावे व ते शक्य नसेल तर त्याच परिसरात सहा फुटापेक्षा जास्त वाढलेली स्थानिक झाडे रस्त्याच्या दुतर्फा दहा मीटर अंतरावर लावावीत असे सांगितले आहे.

रस्त्याच्यां विकासाला विरोध नाही परंतु पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 
१९७५ च्या वृक्षसंवर्धन कायद्यानुसार रस्त्यांची निर्मिती झाल्यानंतर वृक्षलागवडीची मोहिमही शासनाने हाती घ्यावी अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: cutting of trees on the Pandharpur-Bijapur highway