सावधान.. आयुष्यभरासाठी अडचणीत याल! 

परशुराम कोकणे
गुरुवार, 25 एप्रिल 2019

सोलापूर : अनेकदा कळत-नकळत, जोशमध्ये आपण फेसबुक, व्हॉट्‌सऍपवरून जातीय, धार्मिक तेढ निर्माण होईल अशी पोस्ट करतो किंवा इतरांच्या पोस्ट शेअर करतो, लाईक, कॉमेंट करतो.. ही कृती गुन्हा ठरते. सायबर पोलिसांकडून अशा प्रकारच्या पोस्टवर वॉच ठेवला जात असून गेल्या आठवडाभरात 10 तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत. 

सोलापूर : अनेकदा कळत-नकळत, जोशमध्ये आपण फेसबुक, व्हॉट्‌सऍपवरून जातीय, धार्मिक तेढ निर्माण होईल अशी पोस्ट करतो किंवा इतरांच्या पोस्ट शेअर करतो, लाईक, कॉमेंट करतो.. ही कृती गुन्हा ठरते. सायबर पोलिसांकडून अशा प्रकारच्या पोस्टवर वॉच ठेवला जात असून गेल्या आठवडाभरात 10 तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत. 

दोन समाजात, धर्मात जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणे, दंगा घडवून आणण्याच्या उद्देशाने चेतावणी देणाऱ्यांविरोधात भारतीय दंडसंहिता कायद्यानुसार 153, 153 अ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येतो. या गुन्ह्यात तीन वर्षे कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तरुण मंडळी उत्साहाच्या भरात जातीय तेढ निर्माण होईल अशाप्रकारच्या पोस्ट करत आहेत. काहीजण कॉमेंट, लाईक करतात. अशाप्रकारची कृती गुन्हा ठरते. गुन्हा दाखल झाल्यानंतर बऱ्याच अडचणी येतात. पासपोर्ट काढताना किंवा चारित्र्य पडताळणीचा दाखल काढताना गुन्हा दाखल झाल्यास अडचण येते. विद्यार्थ्यांसह सर्वांनीच जातीय, धार्मिक तेढ निर्माण होईल अशाप्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर करू नयेत, असे आवाहन गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अभय डोंगरे यांनी केले आहे. 

सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने करायला हवा. उत्साहात, जोशमध्ये जाती-धर्मात तेढ निर्माण होईल अशाप्रकारची पोस्ट केल्यास पोलिसांत गुन्हा दाखल केला जातो. गुन्हा दाखल होणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही शासकीय सुविधांचा लाभ घेता येत नाही. नोकरीच्या ठिकाणीही चारित्र्य पडताळणीचा दाखल मागविला जातो. बॅंकेत कर्जप्रकरण नाकारले जाते. गुन्ह्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बराच कालावधी जातो, त्यात मानसिक आणि आर्थिक त्रासही होतो. अशा प्रकरणात तीन वर्षे कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. 
- अभय डोंगरे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

Web Title: cyber police keep watching on our social post