लाईक, कॉमेंट, शेअर करताय? थांबा..! 

परशुराम कोकणे 
बुधवार, 4 एप्रिल 2018

सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज पाठविल्यास निषेध म्हणून जाळपोळ आणि दंगलीच्या घटना घडतात. कोणत्याही घटनेची सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे. एखादी घटना सत्य असली तरी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने व्हायरल करणे टाळावे. तुमच्या भागात अशाप्रकारे जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज पाठविण्यात येत असतील तर तत्काळ सायबर पोलिस ठाण्याला कळवा. 
- रवींद्र गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे (ग्रामीण पोलिस)

सोलापूर  : अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाती-धर्मासह राष्ट्रपुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर, व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. कोणत्याही घटनेची खात्री न करता माहिती आणि व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करण्याचे प्रकारही वाढले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी सायबर पोलिस ठाण्याचे पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. 

माहितीचे देवाण-घेवाण करण्यासाठी उत्तम माध्यम असलेल्या सोशल मीडियाचा अलीकडे टाईमपास म्हणून वापर वाढला आहे. आक्षेपार्ह पोस्ट करून वाद निर्माण केला जात आहे. गेल्या काही दिवसांत असे प्रकार वाढले असून सायबर पोलिस ठाण्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिस दलाच्या सायबर पोलिस ठाण्याची टीम सज्ज आहे. 

तरुणांमध्ये प्रमाण अधिक... 
हातातल्या स्मार्ट फोनमुळे शहरासह ग्रामीण भागातील तरुण वर्ग सोशल मीडियाकडे आकर्षित झाला आहे. माहितीचे आदान-प्रदान करणे सोडून लोक आता टाईमपास आणि इतरांना त्रास देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना दिसून येत आहेत. सायबर पोलिस ठाण्याचे पथक विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन याबाबत प्रबोधन करीत आहे. गेल्या काही दिवसांत केलेल्या कारवाईमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. 

फॉरवर्ड केल्यास कारवाई..
तुमच्या मोबाईलवर कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर, व्हिडिओ, ऑडिओ क्‍लिप, छायाचित्रे आल्यास ती तत्काळ डिलिट करा. ती माहिती इतरांना फॉरवर्ड केल्यास सायबर पोलिसांकडून तत्काळ कारवाई केली जात आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक कार्यरत आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज पाठविल्यास निषेध म्हणून जाळपोळ आणि दंगलीच्या घटना घडतात. कोणत्याही घटनेची सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे. एखादी घटना सत्य असली तरी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने व्हायरल करणे टाळावे. तुमच्या भागात अशाप्रकारे जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज पाठविण्यात येत असतील तर तत्काळ सायबर पोलिस ठाण्याला कळवा. 
- रवींद्र गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे (ग्रामीण पोलिस)

Web Title: cyber police watch social media