आता इमारतीत सायकल पार्किंग सक्तीचे

आता इमारतीत सायकल पार्किंग सक्तीचे

बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले; मोटारी, दुचाकींसारखीच स्वतंत्र व्यवस्था

कोल्हापूर - मोटारीचे व दुचाकीचे रोज एक नवे मॉडेल बाजारात येत आहे. यामध्ये सायकल दुरापास्त होत चालली असली, तरीही शासनदरबारी अजूनही तिला मानाचे स्थान आहे. त्यामुळेच आता इमारतीत मोटार, दुचाकीचे पार्किंग असले तरीही सायकलसाठी स्वतंत्र पार्किंग आवश्‍यकच असणार आहे.

नियम काय आणि कसा असेल हे सांगता येत नाही. याचाच एक नमुना म्हणजे सायकलसाठी सक्तीचे पार्किग होय. शहरात रोज एकावर एक मजले चढत आहेत. एक दोन नव्हे, तर तब्बल अकरा मजल्यांपर्यंत बांधकाम क्षेत्राने मजल मारली आहे. प्रत्येक ठिकाणी मोटार पार्किंगसाठी जागा निश्‍चित करून दिली जाते. काही ठिकाणी त्यासाठी वेगळे पैसे आकारले जातात, मात्र इमारतीत सायकल पार्किंग महत्त्वाचे असल्याचा आदेशच निघाल्यामुळे आता प्रत्येक इमारतीत सायकलसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावीच लागणार आहे. सायकल कोण वापरते, असे म्हणणाऱ्यांनासुद्धा आता सायकल पार्किंगसाठी जागा ठेवावीच लागणार आहे. साधारण अपार्टमेंट किती क्षेत्रफळात आहे, किती फ्लॅट आहेत, यावर पार्किंगचे क्षेत्रफळ अवलंबून आहे. ज्या इमारतीत चारचाकीसाठी पार्किंग आहे, दुचाकीसाठी स्वतंत्र पार्किंग आहे, त्या ठिकाणीसुद्धा आता  सायकलसाठी स्वतंत्र पार्किंग करावेच लागणार आहे. त्यामुळे अनेक बिल्डर्स-डेव्हलपर्सचे धाबे दणाणले आहेत. यामुळे बांधकाम व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यांना पुन्हा प्लॅन बदलावा लागत आहे. किंबहुना आहे त्या जागेत फ्लॅटची संख्या कमी करून सायकल पार्किंगसाठी जागा करावी लागत आहे. एक सायकल काय करू शकते, हे यावरून दिसून येते.

सर्व महापालिकांना नियम लागू
‘ड’ वर्ग महापालिकेसह सर्व पालिकांमध्ये सायकल पार्किंगचा नियम आहे. त्यामुळे शहरासह शहरी पठडीत मोडणाऱ्या ग्रामीण भागातसुद्धा सायकलसाठी स्वतंत्र पार्किंग दिसणार आहे. केवळ शहरापुरता हा नियम मर्यादित नसल्यामुळे या नियमाला अधिक महत्त्व आहे.

व्यायामासाठी सायकलचा वापर
केवळ सरकार दरबारी सायकलला मानाचे स्थान मिळाले आहे. त्यामुळे आता प्रत्येक अपार्टमेंटमध्ये ज्या पद्धतीने चारचाकी, दुचाकीचे स्वतंत्र पार्किंग असते त्याच पद्धतीने सायकल पार्किंगसुद्धा दिसणार आहे. सध्या सायकल फारशी वापरात नसली तरीही भविष्यात व्यायामासाठी प्रत्येक घरी सायकल आली तर पार्किंगचा प्रश्‍न उद्‌भवू शकतो याचाही विचार करून हा नियम केला असल्याचे काही तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com