सोलापुरात 'सायकल ट्रॅक'; 10 वर्षांनंतर मुहूर्त

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 18 जुलै 2018

आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार जुना होटगी नाका ते विमानतळापर्यंतचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या मार्गावर अतिक्रमण केलेल्या 20 ते 25 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांनी तत्काळ अतिक्रमण दूर केले नाही तर महापालिका विशेष मोहीम राबवणार आहे. 
- लक्ष्मण चलवादी, प्रभारी सहायक संचालक, महापालिका नगररचना विभाग 

सोलापूर : वाहतूक सुरळीत होण्यासाठी महत्त्वाच्या मार्गावर सायकलींसाठी स्वतंत्र मार्ग (सायकल ट्रॅक) करण्याचा आदेश राज्य शासनाने 2008 मध्ये दिला होता. त्याला तब्बल 10 वर्षांनंतर मुहूर्त मिळाला असून, जुना होटगी नाका ते विमानतळापर्यंत ही सुविधा करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेले सर्वेक्षणही पूर्ण केले आहे. या मार्गावर वृक्षारोपणही केले जाणार आहे. 

राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात सायकलींसाठी स्वतंत्र मार्ग करण्याचे आदेश शासनाने 2008 मध्ये दिले. सोलापूर महापालिकेसही ते मिळाले. मात्र, त्याबाबत प्रशासनस्तरावर काहीच हालचाली झाल्या नाहीत. तत्कालीन प्रशासनाने हा आदेश सर्वसाधारण सभेकडेही माहितीस्तव पाठविण्याची तसदीही घेण्यात आलेली नाही. वाहतूक सुरळीत होण्यासाठी अत्यंत आवश्‍यक असलेला हा आदेश दडवून ठेवण्यातच धन्यता मानली गेली. त्यानंतर तब्बल 10 वर्षांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पुढाकार घेतला असून, त्यासाठी आवश्‍यक असलेले सर्वेक्षणाचे काम नगर रचना कार्यालयाने पूर्ण केले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर शहराच्या काही प्रमुख मार्गांवर तरी किमान सायकलींसाठी स्वतंत्र मार्ग होण्याची गरज आहे. सध्या पुणे, जयपूर, बंगळुरू यासह चीन, थायलंड, हॉलंड, बॅंकॉक या ठिकाणी सायकलींसाठी स्वतंत्र ट्रॅक आहे. सोलापूर शहरात स्वयंचलित दुचाकींची संख्या वाढत असली तरी सायकलचे प्रमाणही वाढत आहे. विद्यार्थी, कामगार वर्ग, मजूर तसेच महिला सायकलींचा मोठ्या संख्येने वापर करतात. मात्र, वाहनांच्या गर्दीमुळे वाट मिळण्यासाठी सायकलस्वारांना मोठी कसरत करावी लागते. सायकलींसाठी स्वतंत्र मार्ग झाल्यास ही अडचण दूर होणार आहे. 

आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार जुना होटगी नाका ते विमानतळापर्यंतचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या मार्गावर अतिक्रमण केलेल्या 20 ते 25 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांनी तत्काळ अतिक्रमण दूर केले नाही तर महापालिका विशेष मोहीम राबवणार आहे. 
- लक्ष्मण चलवादी, प्रभारी सहायक संचालक, महापालिका नगररचना विभाग 

Web Title: cycle track in Solapur