'गॅस'ची बेकायदेशीर खुली विक्री

राजेश मोरे
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

येथे कार्यरत आहे यंत्रणा
शहरात बेकायदेशीर गॅस भरून देणारी यंत्रणा कनाननगर, उमा टॉकीज परिसर, शाहूपुरी, संभाजीनगर, आयटीआय, आपटेनगर परिसरासह उपनगरांतील विविध भागांत सुरू आहे.

कोल्हापूर - घरगुती वापराच्या सिलिंडरमधून रिक्षा, मोटारींसह छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरून देण्याचा प्रकार शहरात खुलेआम सुरू आहे. मोठ्यातून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरताना स्फोट होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत, मात्र जीवित हानी झाल्याशिवाय कारवाईच करायचीच नाही, अशी भूमिका सुस्त पोलिस यंत्रणेने घेतली आहे काय? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.

वाहनांत पेट्रोल, डिझेलचा वापर आता कमी झाला आहे. त्यापेक्षा स्वस्त असणाऱ्या गॅसचा वापर मोठ्या प्रमाणावर वाहनांसाठी केला जातो. शहरात गॅस पंपाची संख्या तुलनेत कमी आहे. तो गॅस घरगुती सिलिंडरच्या तुलनेत महाग असल्यामुळे सर्रास वाहनांत घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. असा गॅस उपलब्ध करून देणारी यंत्रणाही शहरात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. आडोशाच्या ठिकाणी अशा यंत्रणेचा व्यवहार बिनधास्त चालतो. मोठ्या सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये अगर थेट रिक्षा, मोटारींत गॅस भरून दिला जातो. गॅसची मोजदाद करण्यासाठी वजनकाटा आणि मीटरचा (गॅस प्रेशर मीटर) वापर केला जातो. या यंत्रणेकडून कारावाई होऊ नये, याची दक्षता घेतली जाते.

बेकायदेशीर यंत्रणा कारवाईचा कानोसा घेऊन आपले व्यवहार काहीकाळ बंद ठेवते, अगर तात्पुरत्या स्वरुपात जागाही बदलते. जुन्या ठिकाणी एकाद्या व्यक्तीची नेमणूक करून ग्राहकांना नव्या जागेची माहिती दिली जाते. कारवाईबाबतचे "अर्थ'पूर्ण सर्व सेटिंग महिन्याच्या महिन्याला केले आहे, अशी हमी त्यांच्याकडून ग्राहकांना दिली जाते. हा प्रकार गैर असूनही चार पैशांच्या बचतीसाठी ग्राहकही त्यांच्याकडे आकर्षित होतात.

धडक कारवाई करा
कालच (ता. 10) कारंडेमाळ येथे मोठ्या सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरताना स्फोट झाला. त्यात तिघे जण जखमी झाले. त्यांच्याकडे एक दोन नव्हे, तर तब्बल 85 छोटे-मोठे गॅस सिलिंडर पोलिसांनी जप्त केले. दोन महिन्यांपूर्वी पाचगाव परिसरात मोटारीत गॅस भरताना स्फोट होऊन ती खाक झाली. आसपासचे नागरिक भीतीपोटी याबाबत तक्रार देत नाहीत. पुरवठा विभागाच्या पुढाकारातून हातावर मोजण्या इतपतच कारवाईची नोंद पोलिस दप्तरी आहे. कारवाईसाठी प्रत्येकवेळी दुर्घटनेची अगर वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहिली जाते. सर्वज्ञात असणाऱ्या अशा यंत्रणेवर पोलिसांनी धडक कारवाई करावी, अशी मागणी सामान्य नागरिकांतून केली जात आहे.

येथे कार्यरत आहे यंत्रणा
शहरात बेकायदेशीर गॅस भरून देणारी यंत्रणा कनाननगर, उमा टॉकीज परिसर, शाहूपुरी, संभाजीनगर, आयटीआय, आपटेनगर परिसरासह उपनगरांतील विविध भागांत सुरू आहे.

Web Title: cylinder illegal sales in kolhapur