चंदनासाठी ‘एसपी’ बंगला आवारात दरोडा

सांगली - पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याच्या आवारात तोडलेली चंदनाची झाडे.
सांगली - पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याच्या आवारात तोडलेली चंदनाची झाडे.

करवत, सत्तूरने पोलिसांवर हल्ला; चौघांना केले गजाआड, दोघे गेले पळून

सांगली - ऐन दसऱ्याच्या मध्यरात्री पोलिस मुख्यालयात जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या ‘दक्षता’ बंगल्याच्या कुंपणाची भिंत ओलांडून चंदनतस्करांनी दरोड्याचा प्रयत्न केला. बंगल्याच्या मागील बाजूस कुंपण भिंतीच्या आत असलेली चंदनाची दोन झाडे तोडून ती पळवून नेताना चोरट्यांची पोलिसांशी झटापट झाली. त्यांनी करवत, सत्तूरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दोघे पळून गेले तर चौघांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. 

मिरज शहर चंदनतस्करीसाठी कुख्यात बनत असताना पोलिस दलाने बघ्याची भूमिका घेतली होती. आता तस्करांनी थेट पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याच्या आवारात घुसखोरी केल्याने अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी त्याची पाळेमुळे खणून काढू, देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात ते दडलेले असू देत, कुणीही असू देत, त्यांना सोडणार नाही, अशा भाषेत इरादा स्पष्ट केला. अपर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, उपाधीक्षक धीरज पाटील या वेळी उपस्थित होते. 

तानाजी हरी खराटे (वय ३२), राजू कालिदास पाखरे (२५),  कांतिलाल उत्तम चवरे (३८, तिघे पेन्नूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर), सोनू शंकर बनसोडे (२४, चिंचोली, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली. समाधान शिवाजी चवरे आणि युवराज शहाजी चवरे (दोघे पेन्नुर) पसार झाले. या कारवाईत कार (एमएच १३ बीएन ४७१९) जप्त करण्यात आली. 

श्री. शिंदे यांनी माहिती दिली, की मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास अपर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या बंगल्याचे सुरक्षा रक्षक पोलिस दीपक तुकाराम वडेर यांना एसपींच्या बंगल्यामागील बाजूस लाकडांचा आवाज आला. ते सावध झाले. त्यांनी तातडीने एसपी बंगल्याबाहेरील सुरक्षा रक्षक, चालकांना सावध केले. नियंत्रण कक्षाला माहिती दिली. चारही बाजूने चोरटे घेरले जातील, अशी व्यवस्था झाल्यावर एकाच वेळी पोलिसांनी हल्लाबोल केला. त्यावेळी झटापट झाली. चौघांना पकडण्यात यश आले. दोघे करवत, सत्तूर घेऊन पोलिसांच्या अंगावर धावून गेले. जीवे मारण्याची धमकी देऊन ते पळाले. कुंपण भिंतीवरून उडी घेऊन त्यांनी हॉटेल आयकॉन इनच्या बाजूने पोबारा केला. त्यांनी जाताना चंदनाचा एक ओंडका नेला. चार ओंडके जप्त केले. चोरट्यांनी छोट्या करवतीसह मध्यरात्री दोन-अडीचच्या सुमारास परिसरात प्रवेश केला. दोन झाडे तोडली. त्याचे छोटे ओंडके केले. ते घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना घेरले. पोलिस दलाच्या जिव्हारी घाव घालणारा हा प्रकार घडल्याने पोलिसांना बोलावून सतर्क करण्यात आले आहे. 
 

कर्नाटक कनेक्‍शन
कर्नाटक सीमा भागातील सुगंधी द्रव्य बनवणाऱ्या कारखान्यांकडून चंदनाची खरेदी होते. किलोवर चंदन विकले जाते. किलोचा दर ४ हजार रुपये आहे. तिथे चंदन विकणारी संघटित गुन्हेगारांची टोळी आहे. त्यांच्याकडून एक कार जप्त करण्यात आली. ती कुणाच्या मालकीची आहे, याचा तपास सुरू असल्याचे अधीक्षकांनी सांगितले.

एसपी बंगल्याची रचना
पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याला दोन प्रवेशद्वारे आहेत. एक सांगली-मिरज रस्त्याकडे आहे. दुसरे मुख्यालयातून आत येताना आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या बंगल्याकडील बाजूस साडेचार ते पाच फूट उंचीचे कुंपण आहे. ते सहज पार करता येते. तिथे भिंतीवर टोकदार सळ्या, बाटल्यांच्या काचा बसवलेल्या नाहीत. त्यामुळे आत येताना व बाहेर पडतानाही चोरट्यांना इजा होण्याची शक्‍यता नव्हती. कुंपणापासून तीन-चार फुटांवरील चंदनाची झाडे त्यांनी तोडली. 

करवतीचा वार काठीवर...
चोरट्यांनी पळून जाताना पोलिसांवर करवत, सत्तूरने हल्ला केला. करवतीचा वार दीपक वडेर यांच्या काठीवर बसला. त्यामुळे ते बचावले. एकाने सत्तूर दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. 
 

याआधीही चोरीची चर्चा 
पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याच्या परिसरात चंदनाची अनेक झाडे आहेत. याआधीही तेथे चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची चर्चा होती. त्याविषयी कोणतीही माहिती नाही, असे श्री. शिंदे यांनी सांगितले. 

पोलिस कर्मचाऱ्यास दहा हजारांचे बक्षीस
मध्यरात्री साडेतीन वाजता एसपींच्या बंगल्यामागील हालचाली टिपून सावधपणे व शिताफीने सर्व यंत्रणेला सतर्क करून कारवाईत पुढाकार घेणारे पोलिस कर्मचारी दीपक तुकाराम वडेर (३९) यांना पोलिस अधीक्षकांनी दहा हजारांचे बक्षीस जाहीर केले. पोलिस नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना पाच हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले. 
 

मिरजेत खणा, मुळे सापडतील...
चंदनचोरीचा प्रकार सामान्य झाला आहे. जिथे चंदनाचे झाड तिथे चोरांचा डोळा हे जिल्हाभर चित्र आहे. मिरज शहर चंदनतस्करांसाठी कुख्यात आहेत. काहींनी कोट्यवधीची माया जमवली, राजकारण केले. बड्या नेत्यांशी संपर्कातून ते नेहमीच सुरक्षित राहिले. चंदनचोरी ही गोष्ट छोटी, मात्र आता थेट एसपींच्या बंगला परिसरात चोर घुसल्याने ती डोंगराएवढी झाली आहे. अधीक्षकांनी या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश दिले. ही पाळेमुळे खणताना मिरजेचे चंदन कनेक्‍शन पुढे येणार का, याकडे विशेष लक्ष राहील. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील यांच्याकडे याचा तपास आहे. त्यांना या कनेक्‍शनची खडान्‌ खडा माहिती असल्याचे सांगितले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com