कृषी विद्यापीठ शासनाचा मेंदू : दादा भुसे 

Dada Bhuse says the Agricultural University are the Brain of Government
Dada Bhuse says the Agricultural University are the Brain of Government

राहुरी : ""शेतमालाला बाजारभाव मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी स्वतः संशोधन करून, विविध वाणनिर्मिती करतात, हे कौतुकास्पद आहे. अशा शेतकरी शास्त्रज्ञांना कृषी विद्यापीठाने प्रोत्साहन द्यावे. शेतकरी आर्थिक सक्षम व आत्महत्येपासून परावृत्त होईल, अशा वाणांचे संशोधन करावे. नावीन्यपूर्ण संशोधन करून शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणतील, अशा कृषी शास्त्रज्ञांचा राज्य शासनातर्फे गौरव केला जाईल,'' अशी घोषणा कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज केली. कृषी विद्यापीठ शासनाचा मेंदू आहे, असेही ते म्हणाले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात रब्बी शेतकरी मेळावा, शिवार फेरी, मागोवा 2019 कार्यक्रमात भुसे बोलत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, आमदार प्रकाश गजभिये व लहू कानडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक विश्वजित माने, कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक डॉ. विजय घावटे उपस्थित होते.

शेतकरी शास्त्रज्ञांना प्रोत्साहन द्यावे

भुसे म्हणाले, ""मुख्यमंत्र्यांचा केंद्रबिंदू शेतकरी आहेत. त्यामुळे कृषी विद्यापीठाच्या संशोधन कार्याला निधी कमी पडणार नाही. परंतु, तसे काम करून दाखविले पाहिजे. शेतकरी विष्णू जरे (रा. बहिरवाडी, ता. नगर) यांनी लसणाच्या वाणाचे संशोधन केले. आता ते लसूण बियाणे विक्री करीत आहेत. अशा शेतकरी शास्त्रज्ञांना विद्यापीठाने प्रोत्साहन देऊन मदत केली पाहिजे. विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर पोचण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांना अवगत केले पाहिजे.'' 

छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांतील शिक्षण, संशोधन, विस्तार, विकासकामे, कार्यासंदर्भातील छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. कुलगुरू डॉ. विश्वनाथा यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आनंद सोळंके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शरद गडाख यांनी आभार मानले. 

"कुलसचिव हटवा'च्या घोषणा 

रिपब्लिकन पक्षातर्फे (आठवले गट) बाळासाहेब जाधव यांनी कृषिमंत्री व महसूलमंत्र्यांना निवेदन देऊन, "कुलसचिव हटवा. विद्यापीठ वाचवा,' अशा घोषणा दिल्या. त्यामुळे पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली. जाधव यांना ताब्यात घेऊन, स्थानबद्ध करण्यात आले. 

"विषमुक्त शेती'साठी पुढाकार घ्यावा : थोरात 

महसूलमंत्री थोरात म्हणाले, ""भाजीपाला व अन्नधान्यावर मोठ्या प्रमाणात कीटकनाशके फवारावी लागतात. शेतमालाचे उत्पादन विषमुक्त मिळाले पाहिजे. हरितक्रांतीनंतर नवीन क्रांती म्हणून "विषमुक्त शेती'साठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा. मागील पाच वर्षे पूर्णवेळ कृषिमंत्री नव्हते. कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांच्या खरिपाच्या बैठकांची प्रथा बंद पडली होती. आता पूर्णवेळ कृषिमंत्री आहेत. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खरीप हंगामाच्या बैठकांची प्रथा पूर्ववत सुरू करावी.'' 

योजना लादल्या जाणार नाहीत

शेतकऱ्यांच्या योजना मंत्रालयातील एसी केबिनमधून लादल्या जाणार नाहीत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, त्यांच्या समस्या समजून घेऊन योजना राबविल्या जातील. काही योजना बंद, तर काहींमध्ये बदल केला जाईल. 
- दादा भुसे, कृषिमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com