दादांपुढे एकी, पाठीमागे बेकी

दादांपुढे एकी, पाठीमागे बेकी

गटबाजीमुळे सोलापूर शहर राष्ट्रवादी खिळखिळी 

सोलापूर - मूठभर कार्यकर्ते आणि ढीगभर नेते अशीच अवस्था सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे प्रभारीपद अजित पवार यांनी स्वीकारले आहे. पवार सोलापूरला आले, की नेत्यांची एकी आणि पवारांनी सोलापूर सोडले की गटबाजी, असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हक्काचा जिल्हा म्हणून सोलापूरकडे पाहिले जाते. कै. भीमराव जाधव, जनार्दन कारमपुरी, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी आमदार युन्नूसभाई शेख हे पुलोदपासूनचे खासदार पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते. मधल्या काळात अजित पवारांना मानणारा गट तयार झाला आहे, तर  शहरात जुन्या विरुद्ध नव्यांचा वाद सुरू आहे. ही गटबाजी थांबवायची कशी, हा प्रश्‍न निरीक्षक प्रदीप गारटकर यांच्यासह वरिष्ठांना भेडसावत आहे. अजित पवारांची कार्यपद्धती पाहता या गटबाजीवर ते कायमस्वरूपी तोडगा काढतील, असा भाबडा विश्‍वास प्रामाणिक कार्यकर्ते बाळगू लागले आहेत. 

राष्ट्रवादी युवकांच्या मेळाव्याला, महिला मेळाव्याला बहुतांश आजी-माजी पदाधिकारी एकत्रित आले होते. जे कोणी कार्यक्रमाला दांडी मारतात याची माहिती अजित पवारांना आपोआप कळते. तरीदेखील केलेल्या कामांचा अहवाल दर दोन महिन्यांनी पाठविला जातो. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने प्रभागात जाऊन भेटी-गाठीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 

- भारत जाधव, अध्यक्ष, सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस

युवक मेळाव्यातही दिसली गटबाजी

सोलापूर शहर राष्ट्रवादीचा युवक अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडीच्या अनुषंगाने युवकचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मृती मंदिरात युवकांचा मेळावा झाला. या मेळाव्यातही शहर राष्ट्रवादीतील ठराविक नेतेच उपस्थित राहिल्याने ‘दादांपुढे एकी, पाठीमागे बेकी’चा पुरेपूर प्रत्यय आला. 

या महिन्यात दादांचा दौरा शक्‍य

सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे प्रभारी म्हणून अजित पवार यांनी जबाबदारी घेतली आहे. महिन्यातून किमान एकदा सोलापूरचा दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर सभेत सांगितले आहे. जूनमध्ये दौरा झाला. आता विधिमंडळाचे अधिवेशनही संपले आहे, त्यामुळे ऑगस्ट अखेरपर्यंत पवारांचा सोलापूर दौरा होण्याची शक्‍यता आहे.

राष्ट्रवादी सदस्यसंख्या

२००२ १२

२००७ १४

२०१२ १६

राष्ट्रवादीसमोरील आव्हाने 

सोलापूर शहर राष्ट्रवादीत आठ गट 

शहराध्यक्षाच्या विरोधासाठी बाकी सगळे एकत्र 

शहरात एमआयएमचा वाढता प्रभाव

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना एमआयएमची पडलेली भुरळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com