हिमोफेलियावर मात करत दादासाहेब बाबर झाले टेक्‍नोसॅव्ही ! 

हेमंत पवार
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

कऱ्हाड  ः दक्षिण तांबवे येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व जन्मताच हिमोफेलिया या जीवघेण्या आजाराने त्रस्त दादासासाहेब हणमंत बाबर या युवकाने संगणकाची कास धरत डिझायनिंगमध्ये कमांड मिळवून टेक्‍नोसॅव्ही होण्यापर्यंत भरारी घेतली आहे. 

कऱ्हाड  ः दक्षिण तांबवे येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व जन्मताच हिमोफेलिया या जीवघेण्या आजाराने त्रस्त दादासासाहेब हणमंत बाबर या युवकाने संगणकाची कास धरत डिझायनिंगमध्ये कमांड मिळवून टेक्‍नोसॅव्ही होण्यापर्यंत भरारी घेतली आहे. 

दादासाहेब हा सातवीत असताना शाळेतच खेळताना पडून त्याच्या गुडघ्यांना दुखापत झाली. त्यामधून होणारा रक्तस्त्राव अनेक उपचार करूनही थांबत नव्हता. तब्बल वर्षभर रक्तच थांबले नाही आणि गुडघा सुजल्याने चालताच आले नाही. त्यामुळे त्याचे सातवीतच शिक्षण थांबले. त्यावेळी दादाला हिमोफेलिया असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितल्यावर त्याला तो आजार असल्याचे स्पष्ट झाले. खेळण्या-बागडण्याच्या वयातच त्याला या आजाराने ग्रासल्याने आई-वडीलही व्यथित झाले. मात्र, दादाने हिंमत न हारता मोठ्या धैर्याने वेदनांवर मात करत छायाचित्रकार अनिल बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेतले. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने स्वतःकडे कॅमेरा नसतानाही मित्रांचे कॅमेरे घेऊन तो निसर्ग फोटोग्राफीसह अन्य फोटो छंद म्हणून काढतो. त्याचबरोबर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली डीटीपी हा कोर्स कऱ्हाडला येऊन त्याने पूर्ण केला. त्याने फोटोग्राफीतून मिळालेले पैसे, मित्रांनी आणि आई-वडिलांच्या मदतीतून संगणक विकत घेतला. त्यावर त्याने डिझायनिंगचे काम सुरू केले. त्यामध्ये गेली चार ते पाच वर्षे तो पाय अखडता येत नसल्याने पाय पसरून बेडवरच डिझायनिंगचे काम करत असून त्यात तो हातखंडा बनला आहे. दादाने बायकोलाही डिझायनिंगचे धडे दिले आहेत. त्यामध्ये त्याही आता करिअर करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. 

काय आहे हिमोफेलिया? 

हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना आयुष्यभर प्रचंड वेदनांना सामोरे जावे लागते. अशा रुग्णांच्या शरीराला कोठेही जखम झाली तर त्यांचे रक्तच थांबत नाही. शरीरात क्‍लॉटिंग फॅक्‍टर कमी असल्यावर हा आजार होतो. त्यासाठी इंजेक्‍शन घेण्याशिवाय पर्यायच नसतो. शरीरावर ताण पडला तर शऱीरातल्या शरीरात, साध्यांत रक्तस्त्राव होतो. त्यासाठी महागडे 15 हजारांचे इंजेक्‍शन एवढाच पर्याय आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dadasaheb babar overcomes from Haemophilia & becomes Technosavvy !