यंदा थरावर थर आठ थर...!

संभाजी गंडमाळे
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - यंदाच्या दहीहंडी उत्सवात आठ थर लावण्याचा निर्धार काही पथकांनी केला आहे. यापूर्वी काही वेळा हा प्रयत्न झाला; पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे यंदा कोणते पथक ‘चौका’ मारणार, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.  

कोल्हापूर - यंदाच्या दहीहंडी उत्सवात आठ थर लावण्याचा निर्धार काही पथकांनी केला आहे. यापूर्वी काही वेळा हा प्रयत्न झाला; पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे यंदा कोणते पथक ‘चौका’ मारणार, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.  

प्रत्येक पथकाने सलामी दिल्यानंतर दहीहंडी फोडण्याचा थरार रंगतो. चौथ्या थरानंतर एकावर एक असे तीन गोविंदा उभारून मनोरा रचणे आणि दहीहंडी फोडणे याला ‘ट्रिपल एक्का मारला’, असे म्हणतात आणि चौथ्या थरानंतर एकावर एक असे चार गोविंदा उभे राहून दहीहंडी फोडली, तर त्याला ‘चौका मारला’, असे म्हणतात. कोल्हापूरच्या उत्सवाचा विचार केला तर सात ते आठ पथके ‘ट्रिपल एक्का’ मारण्यात माहीर आहेत. मात्र, ‘चौका’ मारण्यात अद्यापि फारसे कुणाला यश आलेले नाही. मात्र, काही पथकातील गोविंदांनी ट्रिपल एक्का आणि चौक्‍याचे तंत्र अवगत करण्यासाठी खास मुंबईत जाऊन यंदा प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे आम्ही सलामीलाच आठ थर लावतो. दुसऱ्या कुठल्या पथकाने आठ थर नाही लावले तर बक्षीस मिळाले पाहिजे, असा आग्रह धरला आहे. मात्र, एकूणच उत्सवाच्या नियमानुसार केवळ आठ थर लावले तरी दहीहंडी फोडणे महत्त्वाचे असते आणि तोच थरार पहाण्यासाठी हजारोंचा समुदाय एकवटला जातो. 

यंदाच्या उत्सवात शिरोळच्या ‘अजिंक्‍यतारा’, ‘गोडीविहीर’, ‘जय हनुमान’, कुटवाडचे ‘नृसिंह’, तासगावच्या ‘नाईक’, ‘शिवगर्जना’, ‘शिवनेरी’, ‘शिवाजी युवक’, ‘महारूद्र’, ‘बॉक्‍सर’, रोहनभैय्या कांबळे पथकांसह गडहिंग्लजच्या नेताजी पालकर आदी पथकांत दहीहंडी फोडण्याची जिगर पणाला लागणार आहे.

आम्ही आठ थर लावण्याची तयारी केली आहे. बक्षिसाच्या रकमेपेक्षा आम्ही गडहिंग्लजचे नाव मोठे करतो, याचा अभिमान आहे. 
- नेताजी पालकर, गडहिंग्लज

यंदाच्या उत्सवासाठी आम्ही सर्वतोपरी तयारी केली आहे. ‘चौका’ लावण्याचा आमच्या पथकाचा प्रयत्न असेल. 
- कुमार जाधव, नाईक गोविंदा पथक, चिंचणी, तासगाव

Web Title: Dahihandi Govinda