पथके झाली कमी, तरीही जिगर कायम!

संभाजी गंडमाळे
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

दहीहंडीचा उत्सव अवघ्या सहा दिवसांवर आला आहे. गोविंदा पथकांच्या सरावाला वेग आला असून यंदाही या पथकांत तरुणाईचा सळसळता सहभाग लाभणार आहे. लाखमोलाच्या दहीहंडी फोडण्यासाठी ही पथके सज्ज झाली आहेत. एकूणच दहीहंडी उत्सव आणि यंदाच्या वैशिष्ट्यांविषयींचा वेध आजपासून...

कोल्हापूर - एकीच्या बळाचे प्रतीक असलेला दहीहंडीचा सोहळा यंदाही जल्लोषात साजरा होणार आहे. पावसाने काही उसंत घेतलेली नसली तरीही भर पावसात गोविंदांचा सराव सुरू आहे. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळत नसल्याने आता पथकांची संख्या कमी झाली असली तरी यंदाही दहीहंडी आम्हीच फोडणार, ही जिगर कायम आहे. दरम्यान, यंदा कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील चौदा पथके सज्ज झाली असून चार हजारांवर गोविंदा यानिमित्ताने एकवटणार आहेत.   

शिरोळ, गडहिंग्लज, तासगाव आणि अलीकडच्या काळात राधानगरी तालुक्‍यातील काही पथकेही दहीहंडी फोडण्यासाठी मैदानात उतरू लागली आहेत. गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने दहीहंडीवरील निर्बंध उठवल्यानंतर गोविंदा पथकांचा उत्साह आणखी वाढला आणि जल्लोषात दहीहंडीचा सोहळा साजरा झाला. यंदाही तितक्‍याच जल्लोषात शहरात दहीहंडीचे सोहळे रंगणार आहेत. 

बक्षिसाची रक्कम किती, यापेक्षा केवळ पथकाच्या प्रतिष्ठेसाठी पथके यंदाही मैदानात उतरतील. मनोरा रचल्यानंतर एखाद्याला शिंक जरी आली, तरी सारा मनोरा कोसळू शकतो. त्यामुळे पावसाने आजारी असलेल्या गोविंदांना वगळून अनेक पथकांनी पुनर्रचना सुरू केली आहे. किंबहुना, अडचणी नसल्या तर दहीहंडी कसली, ही पथकांची सकारात्मक मानसिकता कायम असून त्यातूनच दहीहंडीचा थरार आणखी वाढत राहणार आहे. 

दहीहंडी आणि ‘अजिंक्‍यतारा’ हे एक अतूट समीकरण आहे. आमची जिगर हीच आमची प्रतिष्ठा मानूनच आम्ही मैदानात उतरतो. बक्षिसाच्या रकमेतून केवळ पथकासाठी नव्हे तर संपूर्ण गावासाठी सांस्कृतिक हॉलसाठी जागा घेतली.  
- धनाजी पाटील, शिरोळ

बक्षिसाच्या रकमेतून सांस्कृतिक हॉलसाठी जागा 
शिरोळचे अजिंक्‍यतारा गोविंदा पथक प्रत्येक वर्षी दहीहंडी फोडणाऱ्या पथकांमधील प्रमुख दावेदार. यंदाही या पथकाचा सराव जोमाने सुरू आहे. आम्ही सहा थर नक्‍कीच लावू शकतो आणि सातवा लावावाच लागला तर सर्वांत पुढे आम्हीच असू, असा आत्मविश्‍वास या पथकातील प्रत्येक गोविंदाला आहे. 

गेली बत्तीस वर्षे या पथकाचा दरारा असून या पथकाकडून कधीही कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी म्हणून प्रसिद्ध असलेली धनंजय महाडिक युवाशक्तीची दीड लाखाची दहीहंडी २०११ साली या पथकाने फोडली आणि बक्षिसातून साठलेल्या रकमेतून गावात सांस्कृतिक हॉल उभारण्याचा निर्णय घेतला आणि जागा खरेदी केली. 
माजी आमदार सा. रे. पाटील यांनी दिलेल्या पंधरा लाखांच्या निधीतून हॉलच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यासाठी विद्यमान आमदार उल्हास पाटील यांनी दहा लाखांचा निधी दिला आहे. 

Web Title: Dahihandi Govinda team