दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, पाऊच दूध विक्री हाच पर्याय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

राज्यात खासगी व सहकारी दूध संघाचे जवळपास वीस भुकटी प्रकल्प आहेत. भुकटी निर्मितीला चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारने भुकटी प्रकल्पधारकांना निर्यात अनुदान जाहीर केले आहे. राज्यात सरकारचे चार दूध भुकटी प्रकल्प अनेक वर्षांपासून बंद आहेत. हे भुकटी प्रकल्प सुरू झाल्यास राज्यातील अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लागेल. 

सोलापूर : राज्यातील दूध उत्पादकांनी प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय दूध उत्पादकांना त्यांच्या घामाचा मोल मिळवून देणारा आहे. संघाच्यावतीने जे दूध भुकटीसाठी टँकरद्वारे पाठविले जाते. त्याच दुधाला अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दूध संघाचे जास्तीत जास्त दूध पाऊचद्वारे विक्री व दुग्धजन्य पदार्थ करण्यासाठी वापरले तर दूध संघाचा तोटा कमी होईल. त्यादृष्टीने आता प्रभावी उपाययोजना करणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. 

सहकारी दूध संघाने शेतकऱ्यांना 27 रुपये दर देणे बंधनकारक केले होते. शासनाने नुसता आदेश काढला होता, संघाला अथवा शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली नव्हती. त्यामुळे हा दर देणे संघाला शक्‍य नव्हते. आता दूध उत्पादकांसाठी राज्य सरकार पाच रुपये देणार असल्याने या आदेशाची अंमलबजावणी शक्‍य आहे. दूध संघाच्यावतीने भुकटीसाठी पाठविल्या जाणाऱ्या दुधाला किमान वीस रुपये दर मिळाल्यास दूध संघाचे तोटे कमी होतील. दूध भुकटी प्रकल्पधारकांनी दूध संघाकडून वीस रुपयांपेक्षा कमी दराने दूध खरेदी करू नये, सरकारला दिलेला शब्द त्यांनी पाळावा अशी अपेक्षाही परिचारक यांनी व्यक्त केली. 

राज्यात खासगी, सहकारी वीस भुकटी प्रकल्प 

राज्यात खासगी व सहकारी दूध संघाचे जवळपास वीस भुकटी प्रकल्प आहेत. भुकटी निर्मितीला चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारने भुकटी प्रकल्पधारकांना निर्यात अनुदान जाहीर केले आहे. राज्यात सरकारचे चार दूध भुकटी प्रकल्प अनेक वर्षांपासून बंद आहेत. हे भुकटी प्रकल्प सुरू झाल्यास राज्यातील अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लागेल. 

Web Title: Dairy milk production milk sale is the only option