सोलापुरातील दलित नगरसेवकांची गोची

Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीतर्फे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी दाखल केली खरी, पण त्यामुळे सोलापूर महापालिकेतील सर्व पक्षात कार्यरत असलेल्या दलित नगरसेवकांची गोची झाली आहे. 

एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती असलेला आदर व समाज आणि दुसरीकडे पक्ष या दोन्हीच्या कात्रीत बहुतांश नगरसेवक अडकले आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा अनेक कारणांनी गाजत आहेच, त्यात आता आणखी एका कारणाची भर पडली आहे. भाजप-बसपमधील काही दलित नगरसेवकांनी ऍड. प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याची उघड भूमिका घेतल्याने भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे.

डॉ. बाबासाहेबांना मतदान करता आले नाही, किमान त्यांच्या वारसाला तरी मतदान करू, मुक्तीदाता बाबासाहेबांच्या प्रती आदर व्यक्त करू, असे भावनात्मक आवाहन करण्यात आल्याने सोलापूर शहर व जिल्ह्यातील वातावरण बदलले. भाजपचे नगरसेवक रवी गायकवाड यांनी तर जाहीरपणे ऍड. आंबेडकरांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले, तसे पोस्टरही प्रसिद्ध केले. याच पक्षातील नगरसेविका वंदना गायकवाड यांनी अद्याप भूमिका जाहीर केली नसली तरी, त्यांचे पती अजित गायकवाड हे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनीही ऍड. आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. सुभाष शेजवाल व प्रा. नारायण बनसोडे यांची भूमिकाही अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, या सर्वांवर समाजाचा दबाव आहे, पक्षापेक्षा समाज महत्त्वाचा आणि बाबासाहेबांचा संदर्भ असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून उच्चशिक्षित दलित बांधवांतही ऍड. आंबेडकरांना पाठिंबा देण्याबाबत एकमत झाले आहे. 

बहुजन समाज पक्षाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन ऍड. आंबेडकरांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. कॉंग्रेसमधील प्रवीण निकाळजे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सुनीता रोटे व शिवसेनेचे मनोज शेजवाल यांची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे. एमआयएम हा वंचित बहुजन आघाडीचाच घटक पक्ष असल्याने एम आय एम च्या नगरसेविका नूतन गायकवाड आणि पूनम बनसोडे यांचा ऍड. आंबेडकर यांनाच पाठिंबा असणार आहे. 

भाजप-कॉंग्रेसला फटक्‍याची शक्‍यता 
भाजप आणि कॉंग्रेस आघाडीतील सर्व दलित नगरसेवकांनी ऍड. आंबेडकरांना पाठिंब्याची भूमिका घेतली तर भाजप व कॉंग्रेसच्या उमेदवारांना त्याचा फटका बसणार आहे. एमआयएमच्या नगरसेविका नूतन गायकवाड यांचे पती प्रमोद यांनी उमेदवारी दाखल केली आहे. ते आपली उमेदवारी कायम ठेवतात की समाजाच्या दबावापोटी माघार घेतात हे लवकरच स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com