बांध फुटले... शेतीचे आणि अश्रूंचे

Dam bursts ... of agriculture and tears
Dam bursts ... of agriculture and tears

राहुरी : म्हैसगाव (ता. राहुरी) पंचक्रोशीत शेरी-चिखलठाण येथे काल (सोमवारी) झालेल्या ढगफुटीसदृश पावसानंतर आज (मंगळवारी) पाणी ओसरले, तेव्हा विदारक चित्र समोर आले. कुरणदरा ओढ्याच्या दुतर्फा दहा किलोमीटरपर्यंतच्या शेतजमिनी उभ्या पिकांसह वाहून गेल्या. काही ठिकाणी दहा ते वीस फूट व्यासाचे, अडीच-तीन फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तीन फुटांपर्यंत उंचीची माती जमा झाली. हातातोंडाशी आलेली पिके व नापिक झालेली शेती पाहून निःशब्द, विमनस्क शेतकरी, शेतीचे फुटलेले बांध पाहून, अश्रूचे बांध फुटलेले शेतकरी, असा माहोल आज दिवसभर परिसरात होता.

महसूल खात्याचे पथक आज (मंगळवारी) नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेरी-चिखलठाण येथे दाखल झाले. दोन दिवसांपूर्वीपर्यंत ऊस, डाळिंबबागा, कपाशी, कांदा ही प्रमुख पिके शेतात डौलाने उभी होती. काल अवघ्या चार तासांच्या पावसात ही पिके होत्याची नव्हती झाली. प्राथमिक अंदाजानुसार 70 हेक्‍टरपेक्षा जास्त शेतजमीन नापिक झाली आहे.

याबाबत "सकाळ'शी बोलताना शेरी-चिखलठाणचे सरपंच डॉ. सुभाष काकडे म्हणाले, ""काल (सोमवारी) पहाटे चार ते सकाळी आठदरम्यान ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस झाला. जिरेदरा व कुरणदरा येथे कृषी खात्याने जलयुक्त शिवार योजनेतून बांधलेले सात लहान-मोठे बंधारे एकापाठोपाठ एक फुटले. दहा किलोमीटर लांबीच्या कुरणदरा ओढ्याला महापूर आला. ओढ्याचे पात्र सोडून पाणी शेतजमिनींमधून चिखलठाण येथे मुळा नदीपात्रात गेले. ओढ्याच्या दुतर्फा शेतजमिनी मातीसह खरडून वाहून गेल्या. मागील साठ-सत्तर वर्षांत एवढा पाऊस पाहिला नसल्याचे वयोवृद्ध ग्रामस्थ सांगत आहेत. शेतजमीन व पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.''

शेरी-चिखलठाण येथे नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्याशिवाय नुकसानीचा अंदाज येणार नाही. ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने फोटो घेतले जातील. प्रथमदर्शनी बाजारमूल्यानुसार कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनातर्फे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करू.
फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com