राजे... आता तुम्हीच आम्‍हाला न्याय द्या!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

‘राजे’ आम्हाला न्याय देण्यासाठी सरकारला सद्‌बुद्धी द्या, अशी प्रार्थना हौसाबाई राऊत, भागाबाई भवड, अनिता लाकन, जनाबाई झोरे, सखूबाई पाटणे, सीबाबई झोरे या प्रकल्पग्रस्त महिलांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर केली.

कोल्हापूर - आठ दिवसांपासून हक्काची लढाई लढण्यास ठिय्या आंदोलन करणाऱ्या प्रकल्पग्रस्त माता-भगिनींनी आज रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. ‘राजे’ आम्हाला न्याय देण्यासाठी सरकारला सद्‌बुद्धी द्या, अशी प्रार्थना हौसाबाई राऊत, भागाबाई भवड, अनिता लाकन, जनाबाई झोरे, सखूबाई पाटणे, सीबाबई झोरे या प्रकल्पग्रस्त महिलांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर केली.

श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. देश-विदेशात शिवजंयती उत्साहात साजरी केली जात आहे. न्याय्य मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संसार मांडलेल्या प्रकल्पग्रस्तांनीही शिवजयंती साजरी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले. ज्याने सर्वच स्तरातील, सर्व जाती-धर्मातील लोकांना न्याय देण्यासाठी आयुष्य वेचले. त्या राजाची जयंती साजरी करण्यात आम्ही कसे मागे राहू, अशीही प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्त महिलांनी व्यक्त केली. ज्याप्रमाणे शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य निर्माण केले.

त्याप्रमाणे या सरकारने आमच्यासारख्या गोर-गरीब रयतेच्या प्रश्‍नाकडे लक्ष द्यावे. अनेक वर्षांपासून लढला जाणार अद्यापही न्याय मिळालेला नाही. प्रकल्पासाठी स्वत:च्या जमिनी देऊन भूमिहीन होण्याची वेळ आली. याची शासनाला नाही, शासन आता प्रकल्पग्रस्तांची बोळवण करत असल्याचा आरोपही केला.

जिल्ह्यातील चांदोली अभयारण्यग्रस्त, वारणा धरणग्रस्त, धामणी प्रकल्पग्रस्त, उंचगी, सर्फनाला, कुंभी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आहेत. जिल्हास्तरावर जे प्रश्‍न आहेत ते तत्काळ सोडविता येणार आहेत. याकडे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी लक्ष घातले पाहिजे.
- मारुती पाटील,
जिल्हा प्रमुख श्रमिक मुक्ती दल

Web Title: Dam project suffers agitation