माणमधील नऊ साखळी बंधारे उन्हाळ्यात तुडुंब!

मोगराळे (ता. माण) - वन विभागातील आडओढा परिसरातील बंधारा तुडुंब भरला असून, याच बंधाऱ्यातून वन्यजीव व पक्ष्यांची तहान भागणार आहे.
मोगराळे (ता. माण) - वन विभागातील आडओढा परिसरातील बंधारा तुडुंब भरला असून, याच बंधाऱ्यातून वन्यजीव व पक्ष्यांची तहान भागणार आहे.

बिजवडी - मोगराळे व तोंडले (ता. माण) येथील वन विभागाच्या हद्दीत तत्कालीन प्रांताधिकारी व सांगलीचे विद्यमान उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला व माण वन विभागाचे वनक्षेत्रपाल आर. बी. धुमाळ यांच्या प्रयत्नातून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जलयुक्त शिवार अभियानामध्ये उभारण्यात आलेले नऊ साखळी बंधारे ऐन उन्हाळ्यात तुडुंब भरल्याचे दिसून येत आहे. त्याचा फायदा परिसरातील गावांबरोबर वन्यप्राणी व पक्ष्यांना होताना दिसून येत आहे. या पाण्यामुळे त्यांची तहान भागत आहे.

मोगराळे व तोंडले परिसरातील पडणारे पावसाचे पाणी हे माण वन विभागाच्या हद्दीतून वाहून फलटण तालुक्‍यात जात होते. तत्कालीन प्रांताधिकारी मुल्ला यांनी या भागाचा पूर्ण सर्व्हे करून तत्कालीन वनक्षेत्रपाल धुमाळ यांच्या सहकार्याने वन विभागाच्या हद्दीत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नऊ साखळी बंधारे बांधले. त्याला जवळपास एक कोटी २८ लाख रुपये खर्च आला होता. बंधाऱ्यांमुळे वर्षानुवर्षे माणमधून फलटणमध्ये वाहून जाणारे पाणी अडवण्यात आले. पहिल्याच पावसात हे बंधारे तुडुंब भरले होते. आजही एखादा दुसरा सोडला तर सर्व बंधाऱ्यांत पाणी दिसून येते.

त्याचा फायदा मोगराळे ग्रामस्थांना झाला आहे. तद्वत परिसरात असलेले लांडगे, कोल्हे, खोकड, ससे यांच्यासह सरपटणारे प्राणी, पक्षी आदी वन्यजीव असून, या बंधाऱ्यातील पाण्यामुळे तहान भागवण्यासाठी त्यांना वणवण करावी लागणार नाही. हे पाणी नसते तर त्यांना आपला परिसर सोडून जावे लागले असते. याउलट पाण्याच्या शोधात इतर परिसरातील वन्यजीव प्राणी व पक्षी या परिसरात येणार आहेत. दरम्यान, या बंधाऱ्यावरून पाइपलाइन करून ते पाणी मोगराळ्यात पाणीसाठा करण्यासाठी मोठी टाकी बांधून त्यात टाकले तर मोगराळे, बिजवडी, पाचवड, जाधववाडी, तोंडले, राजवडी आदी गावांना टंचाईकाळात सुरू असलेले पाण्याचे टॅंकर बंद होऊन हक्काचे नियमित पाणी मिळू शकते. मात्र, यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्‍यकता आहे.

वन विभागाच्या हद्दीत कामे करताना जिल्हा प्रशासनाने सहकार्य केल्याने ते शक्‍य झाले. बंधाऱ्यातील पाणी माथ्यावर नेऊन टंचाईग्रस्त गावांना मिळू शकते. त्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे.
- मिनाज मुल्ला, तत्कालीन प्रांताधिकारी

तत्कालीन उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, सहायक वनसंरक्षक दीपक खाडे यांचे मार्गदर्शनाखाली बंधाऱ्यांची योजना वन विभागाच्या हद्दीत राबवली. आज त्या बंधाऱ्यांतील पाण्याचा लाभ ग्रामस्थ व वन्यजीव प्राणी, पक्ष्यांना होतो आहे. त्याचे समाधान वाटते.
- आर. बी. धुमाळ, तत्कालीन वनक्षेत्रपाल

मोगराळे वन विभागाच्या हद्दीतील बंधाऱ्यामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटत गाव टॅंकरमुक्त होईल. पण, यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून ते पाणी आणणे गरजेचे आहे. प्रशासनाकडे आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- संगीता जगदाळे, सरपंच, मोगराळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com