कार्वेच्या जॅकवेलला धोका ; पुरामुळे पाणी योजनेचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

 नवीन योजनेचा जॅकवेल बांधताना पूरहानीची काळजी घेतली होती. मात्र, महापुराच्या वेगाने जाणाऱ्या पाण्यात जॅकवेलजवळचा भराव वाहून गेला आहे. त्याठिकाणी जाण्यास योग्य रस्ता नसल्याने पंचनाम्याचे काम झाले नाही. पंचनामा झाल्यानंतर आम्ही पुढील प्रस्ताव तयार करू.
- आर. एन. कोळी, ग्रामविकास अधिकारी 

रेठरे बुद्रुक  ः कार्वे येथील नळ पाणीयोजनेच्या जॅकवेलजवळचा भराव महापुरात वाहून गेला. त्यामुळे या योजनेचे अस्तित्व टांगणीला लागले आहे. दहा हजार लोकसंख्येच्या कार्वे येथील जॅकवेलला धोका निर्माण झाल्याने पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांसमोर चिंता निर्माण झाली आहे. भराव वाहून गेल्यामुळे जॅकवेल कोसळणार की काय? ही भीती मात्र कायम आहे. 
गावासह बुलबुल मळा, धानाई मळा, गोपाळनगर, देसाई मळा, शिंदे वस्ती, आनंदमळा, सावंतमळा, कोडोली व कोरेगाव रस्ता याठिकाणी गावच्या लोकांचे वास्तव्य आहे. त्यांच्यासाठी गावाजवळच्या कृष्णा नदीवरील पाणीउपसा योजनेतून पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा होतो. दीड वर्षापूर्वी गावास 24 बाय सात पाणीयोजना कार्यरत झाली. चार लाख 50 हजार व एक लाख 75 हजार लिटर क्षमतेच्या दोन टाक्‍यांमधून पाणीपुरवठा होतो. या योजनेचे नदीकाठी जॅकवेल आहे. ते बांधताना नदीच्या उतारात वाळूचा चाळ व मातीची भर देण्यात आली होती. त्यापुढेही नदीजवळ जमीन होती; परंतु गेल्या आठवड्यातील महापुरात जॅकवेलजवळचा भराव व जमीन वाहून गेल्यामुळे नदीच्या बाजूने तो उघडा पडला आहे. यात जॅकवेलची शिडी व विद्युत वाहक केबलही वाहून गेली. त्यातच नदीवरील मुख्य पुलाजवळच्या स्मशानभूमीजवळचा विद्युत खांब वाकल्याने योजनेचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी पाच ते सहा दिवस पाणीपुरवठा बंद होता. जॅकवेल धोक्‍यात असल्यामुळे पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांसमोर चिंता वाढली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Danger to Jackwell of Carvey village