जंगल बदलताना श्वापदांचा भ्रमणमार्ग धोक्‍यात

सचिन देशमुख
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पाटण - एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी श्वापदांकडून वापरला जाणारा भ्रमणमार्ग धोक्‍यामध्ये आहे. त्या मार्गावर अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची गरज आहे. मात्र, आठ वर्षांपासून त्यांच्या सुरक्षेबाबत केवळ कागदोपत्री खेळ खेळला जातो आहे. यापूर्वीच मार्गावर उभा राहिलेल्या प्रकल्पांसह अन्य गोष्टींमुळे तो मार्ग श्वापदांसाठी धोक्‍याचा ठरत होता. त्यातच तेथे चोरट्या मार्गावरून येणाऱ्या मानवाचा हस्तेक्षप, त्या भागातील नैसर्गिक स्थितीमुळे सुरक्षा तोकडी आहे. परिणामी श्वापदांचे वावरणे धोक्‍याचे होत आहे. 

पाटण - एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी श्वापदांकडून वापरला जाणारा भ्रमणमार्ग धोक्‍यामध्ये आहे. त्या मार्गावर अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची गरज आहे. मात्र, आठ वर्षांपासून त्यांच्या सुरक्षेबाबत केवळ कागदोपत्री खेळ खेळला जातो आहे. यापूर्वीच मार्गावर उभा राहिलेल्या प्रकल्पांसह अन्य गोष्टींमुळे तो मार्ग श्वापदांसाठी धोक्‍याचा ठरत होता. त्यातच तेथे चोरट्या मार्गावरून येणाऱ्या मानवाचा हस्तेक्षप, त्या भागातील नैसर्गिक स्थितीमुळे सुरक्षा तोकडी आहे. परिणामी श्वापदांचे वावरणे धोक्‍याचे होत आहे. 

चांदोली, कोयना व राधानगरी अशा तीन जंगलांच्या मदतीने साकारलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अनेक श्वापदे आहेत. त्यात पट्टेरी वाघही आहे. बिबट्यासारख्या श्वापदांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. ती श्वापदे एका जंगलातून दुसऱ्या जंगलात ज्या मार्गावरून जातात, त्याला भ्रमणमार्ग म्हणजे ‘कॉरिडोर’ असे म्हणतात. तो मार्ग सध्या धोक्‍यात आहे. कोकण कड्यावरील मार्गावर सुरक्षा व्यवस्था नाही, त्या भागातून शिकारी येण्याचे प्रमाण जास्त आहे. त्या भागात मानवाचा वावर वाढला आहे. काही ठिकाणी प्रकल्प उभे आहेत. अशा सगळ्या अडचणींच्या गर्तेत तो मार्ग सापडण्याची भीती व्यक्त होत आहे. मुळातच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला जोडणारे कोकणातून येणारे रस्ते सुरक्षित नाहीत. त्या रस्त्यांवर सध्या तरी सहा ठिकाणी संरक्षक कुटी उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे अद्यापही हवी तेवढी सुरक्षा यंत्रणा उभी केलेली नाही.

काही महिन्यांपूर्वी व्याघ्र प्रकल्पात लावलेले कॅमेरेही चोरीस गेले होते. श्वापदांचा वावर टिपण्यास भ्रमणमार्गावर ते कॅमेरे होते. तेच चोरीला गेल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. त्यावरही काहीही झालेले नाही. अद्याप तेथे सुरक्षा देण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथील श्वापदांची सुरक्षा धोक्‍यात आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अनेक कामे सुरू आहेत. विविध भागात कामे सुरू आहेत. सुरक्षेच्या बाबतीत मात्र दुर्लक्ष आहे. व्याघ्र प्रकल्पातील श्वापदांचा जंगलातील चांदोली ते राधानगरी, चांदोली ते कोयाननगर, बामणोली ते आमदापूर असा भ्रमणमार्ग आहे. त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. कोकण किनारपट्टीवर १५० किलोमीटरच्या टप्प्यावर कोठेच सुरक्षाव्यवस्था नाही. या पट्ट्यात किमान २० किलोमीटरवर एक सुरक्षा कुटी हवी, असा विचार पुढे आला होता. मात्र, त्याला अद्याप गती नाही.

तत्कालीन वनमंत्री (कै.) पतंगराव कदम यांनी त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा आराखडा आखला होता. मात्र, त्याला अद्यापही पुढे चालना मिळालेली नाही. चांदोली ते राधानगरी असा सुमारे ८० तर चांदोली ते कोयनानगर असा सुमारे २० किलोमीटरचा भ्रमणमार्ग किर्रर्र.. झाडांचा असला तरी तेथे कोकण किनारपट्टीवरून लोकांचा वावर आहे. 

तो टाळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था हवी. त्यासाठी तेथील नैसर्गिक स्थितीचाही विचार होण्याची गरज आहे. त्यामुळे ती व्यवस्था पुरविताना वन्यजीव विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. परिणामी त्या भ्रमण मार्गावरून जाणारे श्वापद सध्या तरी सुरक्षित आहे, असे म्हणता येणार नाही.

स्पेशल फोर्सकडेही दुर्लक्ष 
सह्याद्री व्याघ्र स्पेशल फोर्सची गरज असतानाही अद्याप शासनाने ती दिलेली नाही. त्याशिवाय वाघांच्या संरक्षणासाठी अद्ययावत अशी यंत्रणा येथे आलेली नाही. राज्यातील अन्य व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत येथे अत्याधुनिक यंत्रणा देताना होणारे दुर्लक्ष श्वापदांच्या जिवावर बेतत असल्याचे दिसत आहे. वाघ व बिबट्यांची संख्या वाढत असल्याने येथे त्यांचे खाद्य जंगलात उपलब्ध व्हावे, यासाठी येथे हरण, भेकरांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प वगळता प्रकल्पातील अन्य मोठ्या कामांकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे.

Web Title: danger of the revolting of the animals while changing the forest